मुंबई : कालपर्यंत अमेरिकेच्या खैरातीवर जगणारा आणि ऊठ म्हटले की उठणारा पाकिस्तान अचानक अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे अमेरिकेचे पित्त खवळले असेल आणि म्हणून अमेरिकेने इम्रान यांच्या खुर्चीखाली फटाका लावला असा आरोप केला जात असेल तर अमेरिकेचा पूर्वेतिहास पाहता वावगा म्हणता येणार नाही, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून टीका केली आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘पाकिस्तान आणि चीन हे आपले असे दोन शेजारी देश आहेत की, इच्छा असो वा नसो, पण तेथील घटना, घडामोडींची नोंद हिंदुस्थानला घ्यावीच लागते. खास करून पाकिस्तानातील राजकीय घडामोडींवर तर हिंदुस्थानला बारकाईने नजर ठेवावी लागते. इम्रान सरकारविरुद्ध विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावापासून गेले १५ दिवस पाकिस्तानात नित्य नवी राजकीय दंगल सुरू आहे. यावर तोडगा म्हणून मावळते पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर पाकिस्तानची संसदच बरखास्त करून टाकली. इम्रान यांनी सभागृहातील शक्तिपरीक्षेला सामोरे न जाता थेट संसदच विसर्जित करून तीन महिन्यांत निवडणुका घेण्याची घोषणा केली. इम्रान यांच्या या आकस्मिक पवित्र्याने अविश्वास ठराव आणणारे विरोधी पक्ष, इम्रान यांच्या ‘तहरीक ए इन्साफ’ या पक्षातील बंडखोर मंत्री व खासदार आणि पाकिस्तानातील लष्करालाही बुचकळ्यात टाकले.’
दरम्यान, ‘बहुमत सिद्ध करण्याऐवजी इम्रान यांनी संसद बरखास्त करून घटनेचा भंग केल्याचा आरोप पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केल्यानंतर विरोधी पक्षांनी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांविरुद्ध तेथील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने संसदेच्या कामकाजाची सर्व कागदपत्रे मागवली आहेत आणि येते काही दिवस राजकीय दंगलीचा हा वणवा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात भडकताना दिसेल. संसद विसर्जित करताना पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकार अस्थिर करण्यासाठी थेट अमेरिकेवरच दोषारोप केला होता. विरोधी पक्षांचे नेते आणि सरकारमधील आपल्या विरोधकांना हाताशी धरून अमेरिकेनेच आपली सत्ता उलथवून लावण्याचे षड्यंत्र रचले होते, असा गंभीर आरोप इम्रान यांनी केला होता. हा आरोप किती खरा आणि किती खोटा, यावरून पाकिस्तानात वादाला तोंड फुटले असतानाच आता रशियानेही या वादात उडी घेऊन इम्रान यांच्या दाव्याची पुष्टी केली आहे’, असेही राऊत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 KKR vs MI : पुण्यात पॅट पेटला..! मुंबईविरुद्ध कमिन्सची रेकॉर्डतोड फलंदाजी; नक्की वाचा!
- IPL 2022 : बेबी एबीच्या रुपात मुंबईला मिळाला खरा डिव्हिलियर्स? पदार्पणात खेळला ‘नो लूक’ शॉट; पाहा VIDEO!
- IPL 2022 MI vs KKR: रोहित शर्माचा ‘फेव्हरेट शॉट’च ठरला अडचणीचा, उमेश यादवने जाळ्यात अडकवले!
- IPL 2022 KKR vs MI : सूर्यकुमारचं दमदार पुनरागमन..! मुंबई इंडियन्सचं कोलकात्याला १६२ धावांचं आव्हान
- IPL 2022: ‘जेव्हा ‘तो’ चांगला खेळतो तेव्हा मला माझ्या स्वतःच्या मुलाने परफॉर्म केल्यासारखे वाटते’; एमएसके प्रसादचे मोठे वक्तव्य