अपयशाबद्दल राजीनामा देण्याची पद्धत व नीतिमत्ता आपल्या देशात नाही, राऊतांचा भाजपला टोला

sanjay raut amit shah modi

मुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमानं घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोना व्हायरसचा सामना जगभरात सुरु आहे. संपूर्ण जग या कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. या संकटाचा सामना करताना अनेक राज्यकर्त्यांना आपलं पद सोडावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. आजच्या रोखठोकमध्ये संजय राऊतांनी लसीवरुन असलेल्या राजकारणाविषयी तसंच कोरोना रुग्णांच्या संख्येत देश कोणत्या स्थानवर पोहोचला या आणि अशा अनेक विषयांवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. राज्यकर्ते कोरोनाचे प्रायश्चित कधी घेणार? असा थेट सवाल त्यांनी आज उपस्थित केलाय.

वाचा ‘रोखठोक’

कोरोनासारखे संकट हाताळण्यात कमी पडले म्हणून जगातील अनेक राज्यकर्त्यांना पद सोडावे लागले. अनेक देशांत न्यायालयाने राज्यकर्त्यांना फटकारले. जनतेचे रक्षण व संकटांशी मुकाबला करण्यासाठी राज्यकर्ते असतात. अनेक देशांत उलटेच घडताना दिसले.

कोरोनाची दहशत इतक्यात संपेल असे वाटत नाही, पण दहशतीची पर्वा न करता लोकांना कामधंद्यासाठी बाहेर पडायचे आहे. आपल्या देशात कोरोनाची नेमकी स्थिती काय आहे हे आता लाख आणि कोटी अशा आकडय़ांत सांगायची गरज नाही. उत्तर सोपे आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत आपण जगात तिसऱया क्रमांकावर पोहोचलो आहेत. या स्पर्धेत तरी आपण रशियाला मागे टाकले आहे. तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकावर पोहोचायला वेळ लागणार नाही अशी स्थिती सरळ दिसते आहे. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संकट सुरू होतानाच सांगितले होते की, ”कोरोनाचे संकट हे युद्ध आहे. हे युद्ध आपण जिंकू. महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. कोरोनाचे युद्ध एकवीस दिवस चालेल. पण विजय आपलाच आहे!” त्या युद्धाचे शंभर दिवसांनंतर काय झाले यावर पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगायला हवे. कोरोनाची लढाई आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी घेऊनही संपलेली नाही. पंतप्रधानांनी व केंद्र सरकारने आता कोरोनाबाबत बोलणे थांबवले आहे. केंद्र सरकार कोरोनाबरोबर जगायला शिकले आहे.

लस कधी येईल?

कोरोनाचे संकट जगभरात आहे व जोपर्यंत त्यावर ‘लस’ शोधली जात नाही, तोपर्यंत संकट तसेच राहील. त्या ‘लस’ प्रकरणाचेही राजकारण सुरू झाले आहे. लस शोधल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांना स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून करायची आहे. म्हणून ‘लस’ लवकर तयार करा असा लकडा सरकारने काही संस्थांकडे लावला आहे असा आरोप सरकारवर विरोधक करीत आहेत. एकंदरीत, आपल्या देशात कोणत्याही गोष्टीचं राजकारण सहज होऊ शकतं. कोरोनाने जगभरात जे बळी घेतले त्यात अनेक राजकीय बळी आहेत. कोरोना संकट हाताळण्यात कमी पडले म्हणून राज्यकर्त्यांना पद सोडावं लागलं. आपल्याकडील राज्यकर्त्यांना ते कधीच जमणार नाही. जरा खालील जगभरातील बातम्यांकडे पहा.

1) फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्ड फिलीप यांनी राजीनामा दिला आहे. सध्या कोरोनामुळे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका झाली.

2) न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेव्हिड क्लर्क यांना क्वारंटाईनचे नियम तोडल्याबद्दल राजीनामा द्यावा लागला. लॉक डाऊन काळात न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री कुटुंबासमवेत समुद्रकिनारी फिरायला गेले होते. त्यावर देशात गदारोळ झाला. शेवटी पंतप्रधान जेसिंडा ऑर्डर्न यांना आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला.

3) ब्राझीलचे राष्ट्रपती जायर मेसियस बोल्सनरो हे मास्क न वापरता काही ठिकाणी फिरताना दिसून आले. त्याची न्यायालयाने दखल घेतली व राष्ट्रपती बोल्सनरो यांना खडसावले आहे. बोल्सनरो यांना दम देताना ब्राझीलचे न्यायालय काय म्हणतेय ते पहा, ”देशातील कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही. जर राष्ट्रपतींनी यापुढेही कायद्याचा भंग केला तर त्यांना दररोज 2000 रिअल दंड ठोठावला जाईल. राष्ट्रपतीपदाची शपथ घेताना संविधानाचे रक्षण आणि कायद्याचे पालन करण्याची शपथ आपण घेतली आहे हे विसरू नका.

4) कोरोना संकट हाताळण्यात अपयश आल्याने हैती देशाच्या आरोग्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

वरील बातम्यांमागची सत्यकथा अशी की, कोरोनाचे संकट गंभीर आहे व अशा संकटाशी सगळ्यात आधी राज्यकर्त्यांना लढायचे असते. ”कोरोनाचा विषय फार गांभीर्याने घेऊ नका. तो एक साधा ताप आहे” अशी मुक्ताफळे उधळणाऱया बोल्सनरो यांच्या ब्राझील देशात कोरोनाने लाखावर बळी घेतले व आता स्वतः बोल्सनरो यांनाच कोरोना झाला. हीच भाषा व वर्तणूक अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी ठेवली. न्यूयॉर्कसह संपूर्ण अमेरिका त्यामुळे संकटात कोसळली. कोरोनाची बजबजपुरी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव घडवून आणेल असे स्पष्ट दिसते!

आमचा विद्यार्थी सहामाही पास झालायं, प्रॅक्टिकल अजून बाकी आहे – शरद पवार

जबाबदारी कोणाची?

अपयशाबद्दल राजीनामा देण्याची पद्धत व नीतिमत्ता आपल्या देशात नाही. लडाखच्या सीमेवर 20 हिंदुस्थानी जवानांचे मरण (हौतात्म्य) का ओढवलं व त्यांच्या बलिदानास जबाबदार कोण हे कोणी ठरवायचं? रेल्वेचा अपघात झाला म्हणून राजीनामा देणारे रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्र आम्ही पाहिले आहेत. विमान अपघातानंतर नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांनीही राजीनामा दिला होता. भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याबद्दल केंद्रात व राज्यातील अनेक मंत्र्यांना कायमच घरी जावे लागले. त्यात काही मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. पण महामारी, युद्ध, घुसखोरी, कोलमडलेली अर्थव्यवस्था, बेरोजगाराशी लढण्यात आलेले अपयश, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणारा ‘महात्मा’ आपल्या देशात जन्माला यायचा आहे!

जागतिक आरोग्य संघटना!

आपल्या देशात अपराध्यांना शेवटी जनता शासन करते. मग ते राज्यकर्ते असले तरी. देशात कोरोनाने बजबजपुरी माजली. त्या बजबजपुरीने कोटय़वधी लोक बेरोजगार होतील. नव्हे, झालेच आहेत. या संकटातून मार्ग काढायला हवा, पण तो मार्ग काढणारे राज्यकर्ते जगात खरंच आहेत का? कोरोनाप्रकरणी जागतिक आरोग्य संघटना चीनची बाजू घेते म्हणून आरोग्य संघटनेचा निधी रोखणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणजे एक दिव्यच आहे. ट्रम्पसारखे अचाट राज्यकर्ते हेच खरे संकट आहे. जगात सर्वत्र ‘ट्रम्प’ पद्धतीचे राज्यकर्ते संकट वाढवीत आहेत. त्यांना शिक्षा देणारी न्यायालये कधी निर्माण होणार? हा संपूर्ण जगाचाच प्रश्न आहे.

टाळेबंदीने ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांची आर्थिक घडी बिघडली – नाना पटोले