मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. शासनात विलिनीकरण या मागणीव्यतिरिक्त राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. पगारवाढ, वेतनहमी या बाबींची तजवीज केली आहे.परंतु त्यानंतर देखील काही कामगार संघटना अजूनही संपावर ठाम आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता कामावर रुजू न होणाऱ्या कामगारांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतरही काही कामगार संपाबाबत आग्रही आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून एसटी कर्मचाऱ्यांचे पुढारी, भाजपा आणि सदाभाऊ खोत(Sadabhau Khot)-गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत या दोन पुढाऱ्यांनी भरघोस वेतनवाढीचे स्वागत करून संपातून माघार घेतली. भरघोस वेतनवाढ हेच संपकऱयांचे मोठे यश आहे, पण संप सुरू करतानाच कधी व कुठे माघार घ्यायची, हे ज्यास कळते तोच कामगार नेता. कामगारांचा पुरता विध्वंस झाला तरी चालेल, कामगारांच्या संसाराच्या होळ्यांवर आपली चूल पेटविणारे पुढारी या संपातही दिसत आहेत. एखाद्याने अंगावर काळा कोट चढविला व राज्यकर्त्यांवर असभ्य, एकेरी भाषेत हल्ला केला म्हणून आपणच नेते या भ्रमात जे लोक आहेत, त्यांनी कामगारांना संकटाच्या खाईत ढकलू नये.’
दरम्यान, पडळकर, खोत यांनी आग लावली, पण आता ती त्यांना विझविता येत नाही. हे आंदोलकांच्या नेतृत्वाचे अपयश आहे. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्या नावाने शिमगा करून प्रश्न सुटणार नाहीत. राजकीय खाज शमेल इतकेच! संप हे भरघोस पगारवाढीसाठीच होत असतात. सरकारने एस.टी. कर्मचाऱयांना पगारवाढ करूनही संपाचा हट्ट कायम असेल तर कामगारांचे पुढारीच कामगारांचे रक्षण करोत. अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- औरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून ‘अल्टिमेटम’!
- नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल परबांचे सडेतोड उत्तर
- कपिल देव यांनी साधला हार्दिकवर निशाणा; म्हणाले…