मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) ‘संविधान दिनी’ केलेल्या भाषणावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
राऊत लेखात म्हणाले आहेत की, संविधान दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे महनीय विचार प्रकट केले आहेत. त्यात शुद्ध विचार किती व राजकीय विरोधकांवर हल्ले किती ते पाहावे लागेल. शुक्रवारी देशात संविधान दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोदी यांनी ‘नाव’ न घेता काँग्रेसवर टीका केली. मोदी म्हणतात, ‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’ हे लोकशाहीला घातक आहे. संविधान निर्मात्यांनी देशाच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले. आता देशहित मागे पडले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत. मोदी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर काँग्रेससह बहुतेक सर्वच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त स्वपक्षाच्या खासदारांसमोरच बोलले. संविधान दिनाचे महत्त्व लक्षात घेतले तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो?
आजच्या राज्यकर्त्यांना इंदिरा गांधी(Indira Gandhi) यांनी लादलेल्या आणीबाणीविषयी कमालीचा संताप आहे. प्रत्येक वर्षी आणीबाणी लादल्याचा दिवस हा ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जातो. त्या काळात सर्व प्रमुख विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले होते व वृत्तपत्रांसह अनेक गोष्टींवर बंधने होती. या सगळय़ांच्या विरोधात लोकांत कमालीचा रोष होता. जनमत विरोधात जात आहे याची कल्पना असूनही इंदिरा गांधींनी निवडणुका घेतल्या. त्यात त्यांचा पराभव झाला. म्हणजेच इंदिरा गांधी व काँग्रेस पक्षाने संविधानाची पायमल्ली केली नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची सूत्रे ही बिगर गांधी घराण्याकडेच होती. इंदिरा गांधी यांच्या काळातही परिवाराबाहेरचेच लोक अध्यक्ष होते. राजीव गांधी(Rajiv Gandhi) यांच्या हत्येनंतर पी.व्ही. नरसिंह रावांकडे सत्तेची व पक्षाची सूत्रे गेली. तेव्हा कोणीच विरोध केला नाही. आज राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष व्हावा असे त्यांनी सुचविले. पण एकही नेता या जबाबदारीसाठी पुढे आला नाही. याउलट भारतीय जनता पक्षाचे आहे. भाजप ही ‘फॅमिली पार्टी’ नाही, पण गेल्या काही वर्षांपासून तेथे एकाच गटाची हुकूमशाही आहे.
दरम्यान, मोदी हे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी गुजरातच्याच नेत्याला पक्षाचे अध्यक्ष केले. सत्ता व पक्षाची सूत्रे आपल्याच हाती राहावीत यासाठीच ही व्यवस्था होती. काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच आहे. घराणेशाही व पक्षांतर्गत एककल्ली, हुकूमशाही कारभार यात तसे साम्य आहे. एकेकाळी भाजपात वाजपेयी, आडवाणी, मुरली मनोहर जोशी, व्यंकय्या नायडू, सुषमा स्वराज, प्रमोद महाजन, अरुण जेटली असे एकापेक्षा एक सरस नेतृत्व होतेच. आडवाणींनी पाकिस्तानात जाऊन बॅ. जीनांच्या कबरीवर चादर चढवली व जीनांचा ‘इतिहासपुरुष’ म्हणून गौरव केला तेव्हा आडवाणी यांना पदावरून जावे लागले. म्हणजे पक्षात तेव्हा लोकशाही होतीच व चमचेगिरीस स्थान नव्हते. आज नोटाबंदी, चीनची घुसखोरी हे प्रकार देशाच्या मुळावर आले तरी भाजपात ‘ब्र’ काढण्याची हिंमत नाही. ही स्थिती ‘फॅमिली पार्टी’पेक्षा भयंकर आहे. शेतकरी आंदोलन दीड वर्ष चालले, ७०० शेतकरी मरण पावले, पण मोदी व त्यांचा पक्ष मागे हटायला तयार नव्हता, असेही राऊतांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- दक्षिण आफ्रिकेतून स्वदेशी परतलेल्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटचा संसर्ग?
- कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण
- …तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो?- संजय राऊत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल