मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला, तो दिवस होता २८ नोव्हेंबर २०१९. दरम्यान, आज महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण झाली असून त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेलाच घेतलेल्या शपथविधी सोहळ्यासही दोन वर्षे झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक मधून या दोन वर्षांतील राजकीय बदल सांगितले आहेत. तसेच विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच वेळी श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ पहाटेच घेतली त्या सोहळ्यासही दोन वर्षे पूर्ण झाली. मुख्यमंत्री ठाकरे सध्या पाठीच्या दुखण्यामुळे इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे, पण दोन वर्षांत प्रकृती बिघडली आहे ती राज्यातील विरोधी पक्षाची. सरकारला दोन वर्षे झाली त्यानिमित्ताने श्री. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ठाकरे सरकार आता लवकरच पडेल!’ म्हणजे तारखा देण्याच्या फंदातून व छंदातून भाजप अद्यापि बाहेर पडलेला नाही. ठाकरे सरकार पडणार व पुन्हा आम्ही शपथ घेणार, असे श्री. पाटील यांना वाटत असेल तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. फक्त त्यांनी इतकेच स्पष्ट केले पाहिजे की, नव्या सरकारचा शपथविधी ते मध्यरात्री करणार की पहाटे? हेच पाटील काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यकारिणीत म्हणाले होते, ‘सरकार पडेल व आम्ही सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षाने आता बाहेर पडले पाहिजे. आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी लागेल.’ तेच पाटील चार दिवसांत ठाकरे सरकार पडेल असे छातीठोकपणे सांगतात.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे हे गेल्या दोन वर्षांत सगळय़ांना पुरून उरले आहेत. गेल्या दोन वर्षांत ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी व कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी कोणतीच कसर सोडली नाही. ज्याला राजकारणात ‘बिलो द बेल्ट’ म्हटले जाते ते सर्व कमरेखालचे वार करूनही सरकार कायम आहे. विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय ती पहा.
1) भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप पुराव्याशिवाय करणे व फक्त धुरळा उडवणे. ते उद्योग आजही सुरूच आहेत.
2) सुशांतसिंह राजपूतसारख्या प्रकरणांना राजकीय रंग देऊन ठाकरे कुटुंब व सरकारला बदनाम करणे. या प्रकरणात कारण नसताना सीबीआयला घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्ततेवर पहिला प्रहार विरोधी पक्षाने केला.
3) महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याची व खाकी वर्दीचे खच्चीकरण करण्याची एकही संधी विरोधी पक्षाने सोडली नाही.
4) महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार, बलात्कार होतात असे चित्र निर्माण केले व राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून राज्यावर चिखलफेक केली.
5) परमबीर सिंह यांना ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून फडणवीस सरकारच्याच काळात नेमण्यात आले. कल्याण-डोंबिवली-ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी परमबीर हे अथक परिश्रम घेत होते. इतर पक्षांची माणसे फोडून त्यांचा भाजपात प्रवेश व्हावा यासाठी ते त्या काळात घेत असलेले कष्ट काय होते ते एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी सांगतील. तेच परमबीर पुढे मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. (राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक म्हणूनही त्यांना फडणवीस सरकारनेच नेमले.) सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणात हे महाशय सहज फरारी झाले. परमबीर यांनी राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप केले. त्यामागचे बोलवते धनी कोण हे स्पष्ट झाले आहे.
6) फरारी परमबीर यांच्या आरोपांवर अनिल देशमुख यांना ‘ईडी’ने तुरुंगात टाकले. एकनाथ खडसे यांचे जावईदेखील अटकेत आहेत.
7) शिवसेनेचे आमदार, खासदार यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धमकाविण्यात येत आहे.
8) कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या जावयांना खोट्या प्रकरणात ईडीने तुरुंगात टाकले. या प्रकरणाचे सूत्रधार अधिकारी वानखेडे यांना विरोधी पक्षाने पाठबळ दिले.
9) आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे व शरद पवारांच्यावर खोटे आरोप केले. पवारांच्या आप्तांवर इन्कमटॅक्सच्या धाडी घातल्या.
10) महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱयांचा संप चिघळविण्यासाठी विरोधी पक्षाने घेतलेले कष्ट अवर्णनीय आहेत. अमरावतीत जातीय दंगे भडकवून वातावरणात तणाव निर्माण केला.
हे सर्व प्रताप घडवूनही भाजपला सरकारवर साधा चरोटाही पाडता आला नाही. कारण भाजप जे करीत आहे ते राजकारण नसून वैफल्यातून फुटलेल्या कपट-कारस्थानांचे कोंब आहेत. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी जे कमावले ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावले. सत्ता हेच सर्वस्व असेच मानून त्यांची पावले पडत गेली व सत्ता गमावली या धक्क्यातून ते दोन वर्षांनंतरही सावरू शकले नाहीत, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘मी अनकम्फर्टेबल होतो’ म्हणत सुनील शेट्टीच्या मुलाने सांगीतला ‘तो’ अनुभव !
- ‘किरीट सोमय्या यांना महत्व देण्याची गरज नाही’
- २४ महिन्यांतील मविआचे १०० घोटाळे, किरीट सोमय्यांनी केले उघड
- ‘या’ दोन सुपरस्टारसोबत रोहित शेट्टी करणार का काम?