‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल

‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल

narendra modi-sanjay raut

मुंबई : सध्या देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे दर शंभरी पार गेल्याचा विषय चांगलाच चर्चेत असून याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या ‘सामना’ अग्रलेखमधून मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ या व अशा लोकप्रिय घोषणांच्या माध्यमातून देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सात वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला आपल्या तमाम घोषणांचा आता विसर पडला आहे. देशातील महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच क्षेत्रांमध्ये महागाईचा जबरदस्त भडका उडाल्याने सामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. मात्र, दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या सत्तारूढ पक्षाचा एकही नेता-प्रवक्ता महागाईच्या मुद्दय़ावर आता तोंड उघडायला तयार नाही. अन्नधान्य, खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल, बियाणे-खते, स्वयंपाकाचा गॅस, चहा-साखर, डाळी, पीठ-मीठ आणि आता तर भाजीपालाही प्रचंड महागला आहे. तेल आणि डाळींबरोबरच भाज्यांच्या दरवाढीमुळे महिलावर्गाचे स्वयंपाकघराचे बजेट पार कोलमडून गेले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती हेच महागाईचे मूळ आहे आणि त्यामुळेच देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. दिवसेंदिवस उग्ररूप धारण करत असलेल्या महागाईच्या गंभीर विषयावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी धार्मिक उन्माद आणि जातीय विद्वेषाच्या भलत्यासलत्या विषयांत जनतेला गुंग करण्याचे खेळ सरकारकडून खेळले जात आहेत.’

दरम्यान, अनेक भाज्या तर आता सफरचंदापेक्षा अधिक दराने विकल्या जात आहेत. वाटाणा आणि टोमॅटो तर हिवाळ्याच्या हंगामात खूप स्वस्तात विकले जाते. मात्र, आज या दोन्ही वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. हिवाळ्यात २५ रुपये किलोने मिळणारा टोमॅटो आता १०० रुपये किलोवर पोहोचला आहे. अंदमान-निकोबारमध्ये तर टोमॅटो ११३ रुपये किलो म्हणजे पेट्रोलपेक्षाही महाग विकला जात आहे. वाटाणाही १५० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे’, असेही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: