मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात महात्मा फुले विरुद्ध लोकमान्य टिळक असा वाद चांगलाच पेटून उठलेला दिसत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून भाष्य केले आहे. रायगडावरील शिवरायांची समाधी कोणी शोधून काढली यावर इतिहास चिवडण्याचे काम काहींनी सुरू केले आहे. तसेच हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध राज ठाकरे यांनी संभाजीनगरातील सभेत लावला. त्यात तितकेसे तथ्य नाही, असेही राऊत म्हणाले.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध राज ठाकरे यांनी संभाजीनगरातील सभेत लावला. त्यात तितकेसे तथ्य नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजीराजांच्या समाधीचा रायगडावरून शोध लावला याबाबत एकमत आहे, पण त्याबाबत दोन भिन्न प्रवाह आहेत व दोन्ही प्रवाहांचा आदर करणे हेच योग्य आहे. 1869 साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड किल्ल्यावरील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला. शिवरायांची समाधी तेव्हा भग्नावस्थेत होती. शिवराय नावाचे तुफान त्या भग्न समाधीत शांतपणे पहुडले होते. ते तुफान पुन्हा उठल्याशिवाय गुलामगिरीत खितपत पडलेल्या तरुणांना प्रेरणा मिळणार नाही हे फुले यांनी ओळखले व त्यांनी शिवरायांची समाधी जगासमोर आणली.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘धनंजय कीर यांनी महात्मा फुले यांचे चरित्र लिहिले. त्यात ते सांगतात, ”महात्मा फुले हे भारताच्या सामाजिक क्रांतीचे पितामहच होते. फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडचा दौरा केला. त्यांच्या मनात शिवाजीराजांच्या कार्याविषयी व संघर्षाविषयी सन्मान होता. रायगडावर जाऊन ते या महान राजांची समाधी शोधू लागले. सुकलेली पाने व दगडांच्या ढिगाखाली गाडलेली ही समाधी त्यांनी शोधून काढली.” त्यानंतर शिवरायांच्या शौर्यावर पोवाडा लिहिला, इतकेच नव्हे तर, रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्जही महात्मा फुलेंनी केला होता’, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “फुले विरुद्ध टिळक हा वाद निरर्थक, शिवराय महाराष्ट्रात जन्मले हेच…”, संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
- IPL 2022 PBKS vs RR : राजस्थान इज बॅक..! वानखेडेवर पंजाब किंग्जला हरवलं; मुंबईकर खेळाडू चमकला!
- IPL 2022 : “आई फक्त तुझ्यासाठी…” स्पेशल जर्सी घालून मैदानात उतरले लखनऊचे खेळाडू; पाहा VIDEO!
- IPL 2022 LSG vs KKR : केएल राहूल शून्यावर OUT..! लखनऊचं कोलकाताला १७७ धावांचं आव्हान
- IPL 2022 LSG vs KKR : लखनऊ ऑन टॉप..! कोलकाताचा तब्बल ७५ धावांनी उडवला धुव्वा