जे वकील भडकवताय, ते कामगारांचं कुटुंब जगवायला येणार नाहीत; राऊतांचा सदावर्तेंना टोला

जे वकील भडकवताय, ते कामगारांचं कुटुंब जगवायला येणार नाहीत; राऊतांचा सदावर्तेंना टोला

Sanjay Raut And Gunratna Sadawarte

मुंबई : गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एसटी कामगारांना पगारवाढ करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र तरीही एसटी कामगार आंदोलन सुरूच ठेवत आहेत. एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पगारवाढ केल्यानंतर आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी या आंदोलनातून माघार घेतल्यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतले आहे. त्यांनी आंदोलकांच्या ठाम भूमिकेला पाठिंबा दिला आहे. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

कामगारांना भरघोस वेतनवाढ दिली आहे. त्यामुळे कामगार ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. महामंडळाच्या विलीनीकरणा संदर्भातील विषय आहे. तो विषय न्यायालयामध्ये आहे. कामगारांनी कामावर हजर राहणं यातच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं हित आहे. जे कोण वकिल आहेत त्यांना भडकवत आहेत ते त्यांचे कुटुंब जगवायला येणार नाहीत, असं म्हणत संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे गुणरत्न सदावर्तेंना टोला लगावला आहे.

पगारवाढ केल्यानंतरही एसटी कामगार आपल्या संपावर ठाम असल्याने हे आंदोलन पुन्हा गुंतागुंतीचे होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट शब्दात एसटी कामगारांना सल्ला दिला आहे. आपल्या कुटुंबाचा विचार करा, असा सल्ला संजय राऊत यांनी एसटी कामगारांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या