मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर संजय राठोड यांची प्रतिक्रिया

uddhav thakrey vs sanjay rathod

वाशिम : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, आज ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते. बेकाबू गर्दीवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली.पोलिसांचे आदेश झुगारत ५० जणांची परवानगी असताना हजारो समर्थकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. शिवसेनेचे कार्यकर्ते नेते हेच या गर्दीत मोठ्या प्रमाणावर होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेनेच्याच मंत्र्याने केराची टोपली दाखवल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. सामान्यांसाठी वेगळे व मंत्र्यांसाठी वेगळे नियम आहेत का ? असा सवाल करण्यात येत होता. मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियम मोडणाऱ्यांना फटकारलं आहे. ‘कोव्हीड संदर्भातील नियम जे सर्वांसाठी सारखेच आहेत. त्यामुळे पोहरादेवीतील उपस्थितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,’ असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर संजय राठोड यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाप्रमाणे मास्क, योग्य अंतर पाळणे गरजेचं आहे. मी देखील कोणीही मोठ्या प्रमाणात जमू नये असं आवाहन केलं होतं. पोहरादेवी गडावर गर्दी झाली. पण मी दर्शनासाठी गेलो होतो. लोकं स्वत: हून तिथे आली. आजूबाजूच्या शहरातील लोकं तिथं आली. मुख्यमंत्र्यांना पूर्ण महाराष्ट्राची चिंता आहे. दहा दिवसांनंतर मी गेलो होतो. या दहा दिवसात ज्याप्रकारे प्रसारमाध्यमं, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यांच्यामध्ये प्रचार झाला होता त्यामुळे स्वत:हून लोकं त्या ठिकाणी आले.’ असं भाष्य संजय राठोड यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या