‘संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भीक घातलेली नाही’

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपा संदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल झाले होते. पोहरादेवी व संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर राज्य राठोड काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक जमा झाले असून पोलिसांना जमावाला आवरत घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहे. समर्थकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केलं गेलं आहे.

यावेळी पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूने बंजारा समजला दुःख झाले आहे. मी देखील चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही राजकारण सुरु आहे ते अतिशय घाणेरडं आहे. मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझ आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप संजय राठोड यांनी केला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. ‘वन मंत्री संजय राठोड हे आज पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करत नसून हे तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हानच आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करून ते एक प्रकारे आव्हान प्रदर्शनच करत आहेत’, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं पालन करा, गर्दी करू नका, अशा सूचना केल्या आहेत. पण ठाकरे सरकारमधील मंत्रीच आता गर्दी करून कोरोना नियमांची पायमल्ली करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला न जुमानता ते पोहरादेवीत येत आहेत. त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भीक घातलेली नाही. त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे.

त्यामुळे हे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन नसून मुख्यमंत्र्यांसाठीचं आव्हान प्रदर्शन आहे, असं म्हणत कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या