पंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम

टीम महाराष्ट्र देशा : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने इव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला होता. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना याबाबत माहित होते म्हणूनच पक्षातील नेत्यांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप या हॅकरने केला होता.त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. याप्रकरणी चौकशीची मागणी सर्वत्र होऊ लागली. राजकीय नेत्यांच्या तिखट प्रतिक्रिया यावर येऊ लागल्या आहेत.

त्यातच आता मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पंकजा मुंडेंना कॉंग्रेस सोबत येण्याचे आवाहन केले आहे. “गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी ही फक्त कागदावर झाली आणि त्यामुळेच पंकजा मुंडे यांना मी आवाहन करतो तुम्ही मंत्रिपद सोडा तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय त्यामुळे पुन्हा एकदा चौकशीच्या मागणीसाठी आमच्याबरोबर या”. अस थेट आवाहन मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना केल आहे.

आज मुंबई मध्ये एव्हीएम हॅकिंगची आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीसाठी संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं त्यावेळी निरुपम यांनी ही भूमिका मांडली आहे.

तर हे सरकार एव्हीएम हॅक करून निवडून आले आहे. त्यामुळे सत्तेत बसण्याचा नैतिक अधिकार या सरकारला नाही. असा टोला देखील निरुपम यांनी भाजपला लगावला आहे.