आघाडीत बिघाडी : शिवसेनेसमोर लोटांगण घालू नका, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्षाला सल्ला

balasaheb thorat udhav thackarey

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसला डावलण्यात येतंय का? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडला आहे. महाजॉब्स पोर्टलवरुन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्विट करुन थेट महाविकास आघाडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, सत्यजीत तांबे यांनी सवाल उपस्थित केला आहे. “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही”, असे प्रश्न सत्यजीत तांबे यांनी विचारले आहेत.

“महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे” अस ट्विट करत सत्यजीत तांबे यांनी आपली खदखद व्यक्त केली.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटरवरुन व्यक्त केलेल्या नाराजीवरुन कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी भाष्य केले आहे. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीचा फोटो ट्विट करत त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे असं ऐकलं ना? मग युवकांना रोजगार देणाऱ्या सरकारी जाहिरातीत काँग्रेस कुठे आहे? ज्या काँग्रेस नेत्यांना शिवसेनेवर अथांग प्रेम झालं आहे. त्यांना माझे प्रश्न आहेत. शिवसेनेसमोर लोटांगण घालण्यापेक्षा त्यांच्याशी लढा अन्यथा पक्ष संपून जाईल असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.

दरम्यान, त्यानंतर आता राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू कॉंग्रेस नेते राजीव सातव यांनी देखील महाविकास आघाडीतील नेत्यांना सुनावलं आहे. ‘योजना चांगली आहे आणि आमचे पूर्ण सहकार्य आहेच. फक्त सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा. पुन्हा अशी चूक होणार नाही या खात्रीसोबत’. अस ट्विट करत सातव यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली आहे.