fbpx

राज कपूर यांच्या मुलांनी कपूर खानदानाची इज्जत विकली – संजय निरुपम

टीम महाराष्ट्र देशा : हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओवरची कपूर कुटुंबाची मालकी आता संपुष्टात आली आहे. होय, ७० वर्षांचा वैभवी काळ अनुभवणा-या आर. के. स्टुडिओची वास्तू आता गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतली आहे. नुकतीच गोदरेज प्रॉपर्टीजने हा स्टुडिओ खरेदी केल्याची अधिकृत घोषणा केली. येत्या काळात आर. के. स्टुडिओच्या जागी आलिशान फ्लॅट्स बांधले जाणार आहेत. आर. के. स्टुडिओच्या ३३,००० वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक निवासी अपार्टमेंट बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती गोदरेज प्रॉपर्टीजने दिली आहे.

मात्र, आता यावरून कपूर घराण्यावर जोरदार टीकेची झोड उठवण्यात येत आहे. कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी तर राज कपूर यांच्या मुलांनी ६० कोटी रुपयांत कपूर खानदानाची इज्जत विकली असा घणाघात कपूर घराण्यावर केला आहे. “राज कपूर यांच्या मुलांनी केवळ ६० कोटी रुपयांत कपूर खानदानीची इज्जत विकली आहे. गोदरेज कंपनी हा ऐतिहासिक स्टूडियो तोडून या ठिकाणी बहुमजली इमारत बांधणार आहे. आर के स्टूडियो विकणे ही एक हृदयद्रावक घटना असून सरकारमध्ये बसलेले नालायक लोक फक्त तमाशा पाहत आहेत”. अस ट्विट करत संजय निरुपम कपूर घराण्यावर बरसले आहेत.

दरम्यान, आर. के. स्टुडिओच्या जागवेवर नवीन बांधकाम करण्यासाठी आम्ही गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीला निवडले आहे, असे रणधीर कपूर यांनी स्पष्ट केले आहे.