‘या’ मराठी अभिनेत्याने केला राज ठाकरेंचा ‘जाणता राजा’ असा उल्लेख !

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज (ता. २३) भव्य महाअधिवेशन होत आहे. या महाअधिवेशनाच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी ठराव मांडून अमित ठाकरेंचं जोरदार लाँचिंग केलं.

बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून गोरेगावच्या नेस्को कॉम्प्लेक्समध्ये मनसेनं महाअधिवेशनाचं आयोजन केलं आहे. या अधिवेशनात राज ठाकरेंनी आपल्या झेंड्याचं अनावरण केलं. त्यानंतर मराठी अभिनेता संजय नार्वेकर यांनी भाषण केले. भाषणाची सुरुवात करताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक करत त्यांचा ‘जाणता राजा’ असा उल्लेख केला. त्यानंतर नार्वेकर यांनी लागलीच स्पष्टीकरण दिले. राज ठाकरे यांचे नाव राज असल्याने त्यांचा ‘जाणता राजा’ असा उल्लेख केला असे स्पष्टीकरण संजय नार्वेकर यांनी दिले.मनसेच्या संजय नार्वेकर यांनी ठराव मांडले. यात सिने आणि नाटक क्षेत्राशी संबंधित ठराव होते.

दरम्यान,मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. यावेळी बोलताना अभ्यंकर म्हणाले, पक्ष स्थापन झाल्यानंतर आपल्या अनेक संघटना स्थापन झाल्या, प्रत्येक संघटनेनं उल्लेखनीय अशी कामं केलेली आहेत. पक्ष फक्त 13 वर्षांचा आहे, पण जनतेच्या राज ठाकरे आणि आपल्याकडून प्रचंड जास्ती अपेक्षा आहेत. मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृतीसाठी 100हून अधिक केसेस राज ठाकरेंनी अंगावर घेतल्या असल्याचा दावा अभ्यंकर यांनी केला.

अभ्यंकर पुढे बोलताना म्हणाले, कुठल्याही विषयावर राज ठाकरेंनी नेहमीच कठोर भूमिका घेतलेली आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आपले सण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच निडरपणे साजरे झाले. आजवर पक्षाने अनेक स्थित्यंतरं पाहिली, अनेक निर्भीड राजकीय भूमिका घेतल्या, तडफेने आंदोलनं केली. जेट कर्मचाऱ्यांना न्याय देणारं आंदोलन, मराठी चित्रपटांना हक्काचं स्थान चित्रपटगृहांत मिळवून दिलं, आझाद मैदानावर धर्मांधांनी जेव्हा धुडगूस घातला, तेव्हा बेधडकपणे आपण मोर्च्याने त्याला उत्तर दिलं होतं, असं म्हणत अभ्यंकर यांनी राज ठाकरेंवर स्तुतिसुमनं उधळली.