संजय केनेकरांचे…..तुम्हारे खत मे हमारा सलाम….

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कायद्याविरोधात व्यापारी बंद पाळणार आहेत. व्यापारी महासंघाच्या वतीने तशी हाक देण्यात आली आहे. औरंगाबादमध्येही व्यापारी महासंघाने पत्रकार परिषद घेत जीएसटी विरोधात २६ फेब्रुवारी रोजी बंद पुकारणार असल्याचे जाहीर केले आहे. या बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहनही व्यापारी महासंघाने केले आहे. मात्र, असे असताना औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने व्यापाऱ्यांवर लावण्यात आलेल्या कराच्या विरोधात २६ तारखेला बंद पाळण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी केले आहे. एकंदरीत या प्रकाराला ‘तुम्हारे खत में हमारा सलाम’ असेच म्हणावे लागेल.

जीएसटी प्रणालीमुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात जीएसटी कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना नाहक भुर्दंड भरावा लागतोय. या विरोधात व्यापाऱ्यांच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यासाठी आणि केंद्र सरकारने यामध्ये काही बदल करावे यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. मात्र, या बंदच्या आडून औरंगाबाद भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतांना दिसताहेत.

२६ फेब्रुवारी रोजी व्यापाऱ्यांचा बंद यशस्वी होण्याची शक्यता आहे. त्याचे श्रेय कोणत्याही एका पक्षाला जाणार नाही. मात्र, मनपा विरोधात बंदचे आवाहन करून भाजप या बंदचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या