fbpx

अमित शहांच्या कार्यक्रमांना पुण्यातील ‘चाणक्य’ गैरहजर ; संजय काकडे भाजपवर नाराज ?

sanjay kakde

पुणे : गेल्या वर्षी झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे ‘चाणक्य’ ठरलेले खा.संजय काकडेंची भाजपवर नाराजी वाढत असल्याचं दिसत आहे, याच चित्र आज पुण्यामध्ये पहायला मिळालं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक मुख्य नेते आज पुण्यामध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित असताना देखील संजय काकडे यांनी यापासून दूर राहणं पसंत केल्याचं दिसतंय. त्यामुळे ते भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

संजय काकडे यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभेची निवडणूक आपण लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी पुणे लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या आणि विविध पक्ष पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या देखील भेटी घेतल्या होत्या.

तसेच, याबद्दल आपण पक्षश्रेष्ठींशी देखील बोलल्याचं त्यांनी सांगितले होते. मात्र काकडेंच्या उमेदवारीवर पक्षाकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही, त्यामुळे संजय काकडे हे भाजप वर नाराज असल्याचं बोललं जात होतं. आज राष्ट्रीय अध्यक्ष पुण्यामध्ये येऊन देखील काकडेंनी कोणत्याच कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला नाही, त्यामुळे संजय काकडे भाजपची फारकत घेण्याचा मार्गावर असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान पुण्यातील भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी आगामी लोकसभेसाठी मी सुद्धा उत्सुक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे निवडणुकीला आणखीन एक वर्ष असतानाच भाजपमध्ये अंतर्गत कलह माजल्याचं दिसून येत आहे.