भाजप ‘नंबर वन’ बनेल , संजय काकडे यांचे सूचक विधान

पुणे : भारतावर ब्रिटिशांनी १५० वर्षे राज्य केल्यानंतर आपल्या हजारो देशभक्त क्रांतिकारकांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताने संसदीय लोकशाही व्यवस्था स्वीकारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेची निमिर्ती झाली. बाबासाहेबांनी निर्मिलेल्या राज्यघटनेने जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाहीची व्यवस्था आपल्याला मिळाली.

भारतीय लोकशाहीचं अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ठ्य म्हणजे देशाचा सर्वसामान्य नागरिक मतदानाच्या माध्यमातून आपला लोकप्रतिनीधी निवडतो व त्यांच्यातून संपूर्ण देशाला विश्वस्त असलेले सरकार बनते. त्यामुळे मतदानाचा अधिकार हा घटनेनं आपल्याला दिलेला अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे. म्हणून सर्वांनी आवर्जून मतदान केले पाहिजे. खासदार संजय काकडे यांनी आज एसएनडीटी महाविद्यालयात पत्नी उषा काकडे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार काकडे यांनी हे मत व्यक्त केले.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. आपण १७ व्या लोकसभेसाठी मतदान करतोय. मात्र, अजुनही जास्ती संख्येने भारतीय मतदार मतदान करीत नसल्याचे चित्र आहे. मतदानाची टक्केवारी वाढत नाही. हे चित्र बदलायला पाहिजे. वैयक्तिक किंवा आरोग्याच्या कारणास्तव सर्वांनाच मतदान करणे शक्य नसेलही परंतु, इतरांनी मतदानाचा हक्क बजावल्यास ९९ टक्के मतदान होऊ शकते. ज्यावेळी ९९ टक्के मतदान होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही मजबूत होईल आणि स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद आपण उपभोगू. मतदानासाठी सर्वांनी जावं आणि आपला मूलभूत अधिकार बजवावा, असे आवाहन खासदार संजय काकडे यांनी केले आहे.

भाजप ‘नंबर वन’ बनेल!

भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांना या लोकसभा निवडणुकीत देशात व राज्यात सर्वाधिक जागा मिळतील. भाजप व माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींसाठी देशभर अनुकूल वातावरण असून भाजप हा क्रमांक एकचा पक्ष बनेल, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केला.Loading…
Loading...