‘पाच कार्यकर्ते मागे नसतानाही जावडेकरांना मंत्रीपदाची बंपर लॉटरी लागली’

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मटका लागतो कधी कधी, या मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मंत्रिपदाची बंपर लॉटरी पाच कार्यकर्ते मागे नसलेल्या प्रकाश जावडेकरांना लागली. जावडेकरांना घराच्या शेजारीही कोण ओळखत नाही अशी टीका काकडे यांनी केली आहे .

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

काकडेंंचं भाकीत

आम्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न केल्यास भाजपला मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही जिंकता येणार नाही. त्यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन

जावडेकरांची मार्मिक टीका

मी कोणत्याही भाकितांवर बोलत नाही. मात्र काकडेंनी दानवे यांच्याबद्दल मांडलेल्या मतावर गोगावले यांनी कालच पत्रक काढलं आहे. पालिकेच्या वेळी जरी त्यांचं भाकीत खरं ठरलं मात्र एकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, म्हणत जवडेकर यांनी काकडेंना टोला लगावला आहे.

काकडेंंचा पलटवार

पाच कार्यकर्ते मागे नसतानाही प्रकाश जावडेकरांना तर मंत्रीपदाची बंपर लॉटरी लागली. जावडेकरांना घराच्या शेजारीही कुणी ओळखत नाही. त्यांना 2019 च्या निवडणुकीत कळेल मटका की सर्व्हे आहे. एक नगरसेवकही जावडेकर निवडून आणू शकले नाहीत. कार्यकर्तेही घडवू शकले नाहीत. पण जावडेकर यांना यानंतरही केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. ही तर बंपर लॉटरी आहे.