संजय काकडेंनी घेतली भुजबळांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून भाजपलाच घरचा आहेर देणारे खासदार संजय काकडे यांनी आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राज्यसभा खासदार संजय काकडे २०१९ च्या निवडणुकीत पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सर्वश्रुत आहे. त्या पार्श्वभूमीवरच संजय काकडे यांनी भूजबळांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपमध्ये दाळ शिजत नसल्याची कुणकुण लागल्यानेच काकडे राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. मात्र पुणे लोकसभेची जागा आघाडीत काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादी काकडेसाठी ही जागा आपल्याकडे घेणार का ? हा देखील औत्सुक्याचा विषय आहे.

दरम्यान, खासदार संजय काकडे यांनी भाजपला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपासूनच आपले सर्वे पुढे करत अडचणीत आणले आहे. त्यानंतर त्यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांना लक्ष्य केले होते. त्यापाठोपाठ काकडेंनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरच निशाना साधला. त्यामध्ये त्यांनी भाजप-सेना युती झाली नाहीतर दानवेंचा जालण्यातून दीड लाखांच्या मतधीक्याने पराभव होईल.असे म्हणत काकडेनी पक्षांतर्गत नाराजी ओढवून घेतली. त्यांना पुण्यात झालेल्या पक्षीय कार्यकारणीच्या बैठकीतूनही डावलेले होते. त्यामुळे भाजपकडून काकडेंना तिकीट मिळण्याची चिन्हे दिसत नसल्यानेच ते राष्ट्रवादीची वाट धरत असल्याची माहिती मिळत आहे.