fbpx

सत्तेत असताना पवारांनी हमीभाव व मराठ्यांना आरक्षण नाही दिले’ – खा. संजय काकडे

sanjay kakde 1

पुणे : औरंगाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चात शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली होती. त्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत भाजपचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीतील तब्बल ४० वर्षे सत्तेत घालविली. एवढी वर्षे सत्तेत असताना त्यांना शेती मालाला हमीभाव द्यायला आणि मराठ्यांना आरक्षण द्यायला सूचले नाही, अशी टीका भाजपचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी केली. ते विरोधकाची भूमिका उत्तम करीत आहेत. त्यांनी ती कायम बजवावी, अशा शब्दांत काकडेंनी पवारांवर निशाणा साधला.

संजय काकडे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या काँग्रेसच्या धोरणामुळे झाल्या आहेत. अशा सरकारमध्ये १० वर्षे कृषी मंत्री राहिलेले शरद पवार हे मोदी सरकारचे धोरण फसवे असल्याचे म्हणत आहेत. हे मोठे आश्चर्यच आहे.माजी केंद्रीय कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी २००६ मध्ये स्वामिनाथन आयोगाचा अहवाल मान्य केला असता त्याचवेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या, असे काकडे यांनी सांगितले. तेच शरद पवार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट हमीभाव जाहीर केल्यावर पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करत नाहीत. उलट मोदी सरकारचे धोरण फसवे असल्याचे जाहिरपणे सांगत जनतेची दिशाभूल करत आहेत. हे फक्त शरद पवार यांनाच जमू शकते, असेही खासदार संजय काकडे म्हणाले.

मराठा आरक्षणाबद्दल शरद पवार अलिकडच्या काळात बोलत आहेत. प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत पवार हे सत्तेत खूप वर्षे राहिले. तेव्हा ते मराठा आरक्षणाबद्दल एक चकार शब्दही बोलले नाहीत. ही शरद पवार यांची दुटप्पी भूमिका नेहमीच राहिली, अशी टीकाही संजय काकडे यांनी केली.

2 Comments

Click here to post a comment