fbpx

पक्षापेक्षा कोणी मोठा नाही – खासदार काकडे

sanjay kakde

पुणे : खासदार संजय काकडे यांनी येवलेवाडी विकास आराखड्यातील बदलल्या गेलेल्या आरक्षणांची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे मागितली आहे. या विकास आराखड्यात कोणतीही चुकीची कामे होऊ देणार नाही. आराखड्यात केलेल्या चुकीच्या बदलांसंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

येवलेवाडी विकास आराखडा सुरुवातीला प्रशासनाने तयार केला त्यावेळी त्यात कोणती आरक्षणे होती? नंतर पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहर सुधारणा समितीच्या शिफारशीनुसार कोणती आरक्षणे उठविण्यात आली व बदलण्यात आली? हे बदल का करण्यात आले? या सर्व आरक्षणांची सर्व्हे नंबरसह सविस्तर माहिती त्वरित द्यावी, असे पत्र खासदार संजय काकडे यांनी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना 12 सप्टेंबर रोजी दिले आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासाकरीता पुणेकरांनी आम्हाला म्हणजे भाजपला बहुमताने सत्ता दिली. या सत्तेचा वापर पुणेकरांच्या हितासाठी व विकासासाठीच झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष सर्वसामान्य माणसाचा विकास हे आहे. त्यामुळे महापालिकेत कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम होऊ देणार नाही. येवलेवाडीच्या विकास आराखड्यात जर, चुकीचे बदल करुन आरक्षणे बदलली असतील अथवा काढली असतील तर, नगरविकास खात्याकडे व खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन हे चुकीचे प्रकार थांबविण्याचे काम मी करणार आहे, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले.