संजय काकडेंनी घेतली ‘सबसे बडा खिलाडी’ सुरेश कलमाडींची भेट !

blank

पुणे : पुण्यातील दोन ‘एस के’ म्हणजेच खासदार संजय काकडे व माजी खासदार सुरेश कलमाडी यांची भेट झाली. त्यांच्यात बराचवेळ राजकीय गुप्तगू झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या आजच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भाजपचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी भेट घेतली व त्यांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

खासदार संजय काकडे यांनी नुकतेच आपणही पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या घोषणेनंतर खासदार काकडे यांच्या पुणे लोकसभा मतदार संघातील भेटी वेगाने वाढल्याचे दिसून येत आहे. विविध कार्यक्रमातील त्यांची लक्षवेधी उपस्थिती पुणे लोकसभा मतदार संघात ते चांगलेच सक्रिय झाल्याचे निदर्शक मानले जात आहे.

पुण्यातील भीम महोत्सव व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीस त्यांनी सुरुवात केली आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. एस के जैन यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर आज जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ व मुस्लिम समाजातील सन्माननीय असलेले डॉ. पी ए इनामदार यांच्या समवेत खासदार काकडे यांनी पुण्याच्या राजकारणात एक तपाहून अधिक काळ ‘सबसे बडा खिलाडी’ राहिलेल्या काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची भेट घेतली. कलमाडी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून झालेल्या या भेटीदरम्यान तिघांमध्ये बराचवेळ राजकीय चर्चा झाली. कर्नाटक निवडणूक, देश व राज्यातील सद्यस्थिती, पुण्यातील विकासाचे प्रकल्पासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडींबद्दल भेटीत चर्चा झाल्याचे समजते.

महापालिका निवडणुकीपर्यंत खासदार संजय काकडे यांचे राजकारण तसे फारसे कोणाला परिचित नव्हते. राजकारणात नवखे असल्यामुळे खासदार काकडेंच्या बोलण्याकडे व त्यांच्या कृतीकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, महापालिकेतील निकालाचा अचूक अंदाज वर्तविलेले खासदार काकडे चर्चेत आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली निवडणुकीतील जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावून खासदार काकडे यांनी केलेली राजकीय गोळाबेरीज अजूनही अनेकांना बुचकळ्यात टाकते.

खासदार संजय काकडे इच्छुक झाल्याने भाजपमधील स्पर्धेत चांगलीच रंगत आली आहे. राष्ट्रवादीकडून पुण्याच्या लोकसभेवर केलेला दावा आणि त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक रंगतदार असेल हे नक्की.