गिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी

पुणे : आपल्या रोकठोक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य संजय काकडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर यापूर्वी देखील अनेकदा आरोप झाले आहेत. आता तर दोषी ठरलेल्या रेशन दुकानदाराला परवाना बहाल केल्याप्रकरणी न्यायालयाने बापट यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे बापट यांनी आता चौकशी होईपर्यंत वाट न पाहता राजीनामा द्यावा. अशी मागणी भाजप सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली आहे.

गिरीष बापटांनी कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचं न्यायालयाने म्हटल्यावर बापट यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. दरम्यान, कालच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्वीटर वरून मुख्यमंत्र्यांनी मंत्री बापटांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. विरोधी पक्षांनी बापट यांच्या राजीनाम्याची मागणी केलीच आहे पण आता थेट भाजपच्या राज्यसभेतील सहयोगी सदस्याने राजीनाम्याची मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना काकडे यांनी आपली रोकठोक भूमिका मांडली. न्यायालय जर अश्यापद्धतीने ताशेरे ओढले असतील तर वरिष्ठांनी यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा. पण वयक्तिक मला विचाराल तर बापटांनी राजीनामा द्यायला हवा असं मला वाटत असं काकडे यांनी म्हटलं आहे.

नेमक काय आहे प्रकरण?

2016 च्या एका प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांनी काही स्वस्त धान्याची दुकानांची चौकशी करुन नियमाची पायमल्ली करत असल्याने बंद केली होती. मात्र हाच निर्णय गिरीश बापट यांनी रद्द करुन त्या दुकानदारांना पुन्हा एकदा संधी दिली होती. याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती आणि याचिकेवर निकाल देताना खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे.

चौकशीनंतर कारवाई केली तर ती योग्य आहे आणि तो निर्णय मंत्र्यांनी का रद्द करावा हे कळत नाही, असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. गिरीष बापटांनी कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच बापटांनी घेतलेला निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे.Loading…
Loading...