संजय काकडेंची दादांबद्दलची भविष्यवाणी एकली तर तुम्हीही लावाल डोक्याला हात !

पुणे : महाराष्ट्रातील 48 पैकी 46 जागांवरील भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार आजच विजयी झाले आहेत. बारामती व नांदेड लोकसभेची जागा जिंकण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेऊ आणि मतदानाच्या दिवसापर्यंत या दोन्ही जागाही महायुतीच्या उमेदवारांसाठी सकारात्मक करुन तिथेही महायुतीचाच उमेदवार निवडून आणू. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातून 48 खासदार लोकसभेत जातील आणि बारामतीत सुप्रिया सुळे एक लाख मतांनी पराभूत होतील. महाराष्ट्रात यावेळी नक्की इतिहास घडेल, असा आत्मविश्वास पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केला.

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत दादांचा उल्लेख दादा असा करताना खासदार संजय काकडे यांनी पुण्यातल्या दादांची आठवण सभेत बोलताना केली. सभेत बोलताना खासदार काकडे म्हणाले की, पुण्यातही एक दादा आहेत व तेदेखील लवकरच आपल्या व्यासपीठावर दिसतील, असे सांगताच भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंग मध्ये अजित दादांचंही नाव आहे की काय? अशी चर्चा खासदार काकडे यांच्या भाषणानंतर उपस्थितांमध्ये रंगली.

देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व 48 लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी उत्तम पद्धतीने प्रचार मोहिम राबविली आहे. यामुळेच महायुतीला यश मिळणार असून पश्चिम महाराष्ट्रातल्या दहा जागांपैकी नऊ जागांवर आताच महायुतीचा विजय झाला आहे. तर, 22 एप्रिलपर्यंत बारामतीची जागाही महायुतीच्या उमेदवारासाठी सकारात्मक होईल व कांचन कुल सुप्रिया सुळे यांना एक लाख मताधिक्याने पराभूत करतील.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार गिरीश बापट व कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यावेळी खासदार संजय काकडे यांची कार्यकर्त्यांसोबत दुचाकी रॅलीबरोबर ‘ग्रँड एंट्री’ झाली. याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, रासपचे अध्यक्ष व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a comment