विजय शिवतारेंनी महाराष्ट्र – गुजरातमध्ये कशापद्धतीने मालमत्ता मिळवली याची चौकशी करा : संजय जगताप

टीम महाराष्ट्र देशा : जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यात जलयुक्त शिवाराच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे समोर आले आहे. तर खुद जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी या भ्रष्टाचाराची कबुली दिली आहे. यावरुन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी राज्यमंत्री विजय शिवातारेंवर जोरदर टीका केली आहे. पुरंदरमधील जलयुक्त शिवारातील झालेल्या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आज संजय जगताप पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संजय जगताप म्हणाले की, विजय शिवतारे आमदार होण्यापूर्वी काय करत होते आणि आज अचानक इतके मोठे कसे झाले? महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यांनी कशा पद्धतीने मालमत्ता मिळविली, याची चौकशी शासनाने करावी. तसेच विजय शिवतारे यांनी गेल्या 10 वर्षांच्या काळात केवळ विरोधकांवर आणि पवार कुटुंबियांवर जहरी टीका केली. मात्र दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, असे देखील जगताप म्हणाले.

तसेच स्वतःच्या तालुक्यात आणि स्वतःच्या खात्यातील कामात भ्रष्टाचार होतो, मात्र त्यावर मंत्रीमहोदयांना उत्तरही देता आले नाही आणि स्वतःचे खातेही त्यांना व्यवस्थित सांभाळता येत नाही. त्यामुळे पुरंदरमधील जलयुक्त शिवारातील झालेल्या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिवतारेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संजय जगताप यांनी केली आहे.