‘तुम्ही सगळे महाराज एकत्र या; मग होऊन जाऊद्या आमने-सामने’; शिवसेना आमदाराची मुक्ताफळं

sanjay gaikwad

बुलढाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड हे गेले काही दिवस चांगलेच चर्चेत आलेत. चर्चेचं कारण कोरोना काळातील काम वगैरे नाही तर विरोधी पक्षनेत्यांच्या तोंडातच कोरोनाचा विषाणू कोंबण्याच्या भाषेमुळे ! गायकवाड यांना लोकप्रतिनिधी असल्याचा विसर पडत असल्याचे अनेकदा त्यांच्या फेसबुक लाईव्हवरील व्हिडिओमधून दिसून आलं आहे.

आता पुन्हा एकदा संजय गायकवाड हे वादात सापडले आहेत. त्यांची एक बातमी स्थानिक वृत्तपत्रात छापून आली होती. या बातमीमध्ये छापून आलेल्या त्यांच्या विधानामुळे वारकरी संप्रदाय तीव्र नाराज झाला आहे. ‘मांसाहार केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढेल, कोरोनातून तुम्हाला देव वाचवायला येणार नाही,’ असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले होते.

यानंतर वारकरी संप्रदायातील अनेक महाराजांनी त्यांना फोन करून या विधानाचा निषेध केला आहे. दरम्यान, अशाच एका कॉलची रेकॉर्डिंग आता व्हायरल होत असून हा संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमधील संभाषणात, सगळ्या महाराजांनी ३१ मे ला आमने-सामने यावं, असं आव्हानच गायकवाड यांनी दिलं आहे.

‘तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे. पण मी रोज २०-२५ जणांच्या अस्थी जाळू लागलो, तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहित्येय, पण मी जे बोललो ते वास्तव आहे. मी पण नास्तिक नाही परंतु काळाची गरज आहे ते बोललो. तुम्ही सगळ्या महाराजांनी वेगवेगळे फोन करू नका. माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही सगळे एकत्र या मग बघू. आमचं लॉकडाऊन ३० मे ला उठतंय, ३१ मे ला तुम्ही सिंदखेडराजाला या मग आमनेसामने बघू काय होतं?’ असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी काही अपशब्द देखील वापरले.

दरम्यान, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर, ‘शिवसेनेला आणि आपल्याला बदनाम करण्याचे हे भाजपच्या वारकरी सेलचे षडयंत्र आहे,’ अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या