संजय दत्तला पॅरोल, फर्लो शिक्षा नियमानुसारच – उच्च न्यायालय

मुंबई : अभिनेता संजय दत्तला पॅरोल व फर्लोची शिक्षा देताना कोणतेही नियम मोडलेले नाहीत. त्यामुळे संजयला तुरुंगातून लवकर सोडण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्या. एस.पी. धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजयला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

मात्र त्याचा कालावधी संपण्याआधीच आठ महिने त्याची सुटका करण्यात आली. या संदर्भात विरोधकांकडून टीका करण्यात आली. तसेच शिक्षेच्या काळात त्याला मिळणा-या सुट्ट्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी दाखल केली होती.

मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली होती. संजयला सामान्य कैद्याप्रमाणेच वागणूक देण्यात आली होती. त्यामुळे त्याला मिळालेला पॅरोल व फर्लोही नियमानुसारच असल्याचा दावा सरकारने केला होता.