संग्राम जगतापांच्या बॅनरवरून ‘घड्याळ’ गायब, चर्चांना उधान

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे खंदे शिलेदार असणारे अनेक नेते त्यांची साथ सोडत असतानाच आता लोकसभा निवडणुकीत पवारांनी विश्वास दाखवलेले अहमदनगरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते संग्राम जगताप हे देखील शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

संग्राम जगताप हे अहमदनगरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. तर त्यांना शरद पवार यांनी लोकसभेची राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी देखील दिली होती. मात्र आता संग्राम जगताप यांच्या सगळ्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे चिन्ह असलेले ‘घड्याळ’ गायब झाले असून ते राष्ट्रवादीचे नाव देखील वापरत नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, संग्राम जगताप या वेळी राजकीय विश्रांती घेण्याच्या विचारात असल्याची जोरदार चर्चा आहे. केडगाव प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडण्याचे मुख्य उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले असून, त्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करून पाच वर्षे थांबणे व नंतर पुन्हा आमदारकीच्या राजकारणात पुनरागमन करण्याचा त्यांचा विचार असल्याचे बोलले जात आहे.

मागील २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मतविभागणीत आमदार जगताप निवडून आले. गेल्या पाच वर्षांत त्यांनी शहराचे विविध प्रश्न हाताळले. पण राजकीयदृष्ट्या त्यांच्यात व शिवसेनेत संघर्ष कायम राहिला. मागील वर्षी महापालिकेच्या पोटनिवडणुकीत केडगावमध्ये शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या झाली. त्यात आरोपी म्हणून आमदार जगताप यांना अटक झाल्यानंतर त्यांचे राजकीय अस्तित्व अस्थिर झाले आहे.

या खून प्रकरणाची अद्याप सुनावणी सुरू झालेली नाही. जगतापांविरुद्ध दोषारोपपत्रही अद्याप दाखल झालेले नाही, तरी या प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडून अजून सुरूच आहे. दुसरीकडे महापालिकेसह शहरातील प्रत्येक निवडणुकीत खून प्रकरणाची चर्चा होत असल्याने यातून आधी बाहेर पडण्यास त्यांचे प्राधान्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच या वेळी विधानसभा न लढवता विश्रांती घेणे व नंतर पुन्हा आमदारकीच्या राजकारणात येण्याचा त्यांचा विचार असल्याचे सांगितले जात आहे.

त्यांचे वडील आमदार अरुण जगताप यांचा विधान परिषदेचा बराच कालावधी अद्याप शिल्लक आहे. संग्राम यांच्या पत्नी नगरसेविका आहेत. महापालिकेतील सत्ताही जगताप समर्थकांच्या पाठिंब्यावरच आहे. त्यामुळे संग्राम यांनी या वेळी पुढील नियोजन लक्षात घेऊन थांबले तर फारसा फरक पडणार नाही, असाही विचार यामागे असल्याचे सांगतात.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत जगतापांना ४९ हजार मते मिळाली होती तर शिवसेनेचे अनिल राठोड यांना ४६ हजार, भाजपचे अभय आगरकर यांना ३९ हजार व काँग्रेसचे सत्यजीत तांबे यांना २८ हजार मते मिळाली होती. त्यावेळी चारही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यामुळे मत विभागणीत जगतापांनी बाजी मारली. त्यावेळी युतीची एकत्रित मते ८५ हजार व आघाडीची ७७ हजार असल्याचे स्पष्ट झाले होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार असलेल्या जगतापांना नगर शहरात अवघी ५२ हजार मते मिळाली. मागील निवडणुकीत आघाडीला मिळालेल्या मतांच्या तुलनेत ही मते तब्बल २५ हजाराने कमी आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेत मतांचे गणित जुळवणे जगतापांच्या दृष्टीने अवघड असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर शहर भाजपमधील त्यांच्या समर्थकांनीही आपल्या परीने प्रयत्न करून त्यांच्यासाठी नगर विधानसभेची जागा युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडून भाजपला घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले होते. पण मुख्यमंत्र्यांकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. तर दुसरीकडे शिवसेनेकडून राठोडांची उमेदवारी पक्की होत असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे.