‘त्यांनी’ नगरचे विमानतळ पळवून नेले, ते काय विकास करणार ? जगतापांचा विखेंना टोला

टीम महाराष्ट्र देशा : विकासाच्या केवळ वल्गना करायच्या, ब्ल्लू प्रिंट दाखवून जनतेला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जायचे काम ज्यांनी केले, त्या खोटारड्या लोकांनी खा. दिलीप गांधींवर दबाव आणून नगरचे हक्काचे विमानतळ पळवून नेले. ते काय या दक्षिण मतदारसंघाचा विकास करणार. नगर तालुक्यात विमानतळ झाले असते तर मोठा विकास तालुक्याचा झाला असता.त्यांनी विमानतळ उत्तरेत पळवले मात्र स्वतःचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जोगोजागी हेलिपॅड केले. अशी टीका नगर दक्षिणचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी विखे यांचे नाव न घेता केली आहे. ते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बायजाबाई जेऊर येथे दौऱ्यावर बोलत होते.

यावेळी प्रा.रघुनाथभाऊ झिने, किसनराव लोटके, सबाजीराव गायकवाड, उध्दवराव दुसूंगे, दादासाहेब दरेकर, जाकिरभाई शेख, गणेशदादा आवारे, काळूरामतात्या काळे, विलासराव आल्हाट, संतोषभाऊ पवार आदींसह इमामपूर, बहिरवाडी, खोसपुरी आदी ठिकाणचे हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी प्रारंभी जगताप यांनी ग्रामदैवत बायजामातेचे दर्शन घेतले. त्यानंतर जेऊरच्या आठवडी बाजारात विविध भागातून आलेल्या भाजीपाला आणि फळविक्रेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. दरम्यान, सभेच्या सुरुवातीला युवकांनी नववर्षाचे प्रतिक असलेल्या गुढीची प्रतिक्रुती भेट देऊन सत्कार केला.

दरम्यान, मी जरी विधानसभेत शहराचे प्रतिनिधित्व करत असलो तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीवरुन विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवल्याने मला एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. विरोधीपक्ष नेते कितीवेळा निलंबित झाले ते त्यांनी सांगावे. मी वास्तव्याने जरी शहरी असलो तरी ग्रामीण भागशी माझी नाळ जुळली आहे. बाकीचे लोक येतील, गोड गोड बोलतील, मोठी स्वप्ने दाखवतील आणि २३ मार्च नंतर गायब होतील. पण मी कायमस्वरुपी तुम्हाला भेटणारा, तुमच्या हक्काचा दक्षिणेचा संग्राम आहे. शेतमालला हमीभाव मिळवून देण्यासाठी आपण वेळप्रसंगी सत्ता पणाला लावू. अस आवाहन देखील संग्राम जगताप यांनी केल आहे.