पवारांना दणका दिल्यानंतर दुष्काळाने तहानलेल्या जनतेकडून खा. रणजितसिंहांची उंटावरुन मिरवणूक

टीम महाराष्ट्र देशा: नियमबाह्यपणे बारामतीला वळवण्यात आलेले नीरा देवधरचे पाणी बंड करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे, पाणी बंद करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी काढला. त्यामुळे माढ्याचे नवनिर्वाचित खा. रणजितसिंह निंबाळकर आणि माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी चालवलेल्या प्रयत्नांना राज्य सरकारच्या निर्णयामुळे यश आले आहे.

नीरा देवधरचे बारामती आणि इंदापूरला जाणारे पाणी आता फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्यात येणार आहे. आजवर कायम दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या सांगोला तालुक्यातील जनता या निर्णयामुळे सुखावली आहे, सांगोलेकरांनी खा रणजितसिंह निंबाळकर यांची उंटावरुन मिरवणूक काढत आनंद व्यक्त केला आहे.

नीरा देवधरचे पाणी नेमके कोणाचे

दुष्काळी भागाची तहान भागवण्यासाठी २००२ मध्ये नीरा-देवघर धरणाचे काम करण्यात आले, पुणे जिल्हातील भाटघर, नीरा-देवधर आणि गुंजवणी या तीन धरणातून पाणी वीर धरणात येवून तिथून ते दोन कालव्यातून इतरत्र पोहचवले जाणार होते. मात्र त्यांचे काम आजवर पूर्ण झालेले नाही. जोपर्यंत कालवे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे पाणी नीरा कालव्यातून सिंचन व पिण्यासाठी देण्याचे धोरण ठरले होते. नीरा उजव्या कालव्याद्वारे ५७ टक्के तर डाव्या कालव्याद्वारे ४३ टक्के पाणी वाटपाचे धोरण अवलंबण्यात आले.

१९५४ साली पाणीवाटपाच्या करारानुसार उजव्या कालव्यातून एकूण पाण्यापैकी ५७ टक्के पाणी साताऱ्यातील फलटण आणि सोलापूर जिल्हातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्याला पाणी मिळणार होते. तर डाव्या कालव्यातून ४३ टक्के पाणी बारामती आणि इंदापूर या तालुक्याला मिळणार होते, परंतु जाणता राजा म्हणवले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धूर्तखेळी करत ४ एप्रिल २००७ रोजी सन २००९ मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामुळे आता डाव्या कालव्यातून ६० टक्के पाणी बारामती व इंदापूरला तर उरलेले ४० टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही पवारांनी आपली राजकीय ताकद वापरत केलेला करार ३ एप्रिल २०१७ पर्यंतच होता, मात्र तरीही आजवर हे पाणी असेच बारामती, इंदापूरला पळवण्यात येत होते. फलटणचे रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्याने त्यांनी देखील जनतेला वाऱ्यावर सोडत एक शब्द काढला नाही. एका बाजूला दुष्काळी भागाचे हक्काचे पाणी पळवून पवार मात्र माढा लोकसभा मतदारसंघात दरवेळी संगोल्याची तहान भागवण्याची आश्वासने देत राहिले. २००९ साली मावळत्या सूर्याला साक्षी ठेऊन केलेली गर्जना देखील ‘जुमला’ असल्याचे आता उघड झाले आहे.