राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा १ फेब्रुवारीला सांगलीत ‘युवा आक्रोश मोर्चा’

Sangli Youth NCP Morcha News
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, ताजुद्दीन तांबोळी

सांगली : वाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने गुरूवार, १ फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘युवा आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती सांगली जिल्हा अध्यक्ष भरत देशमुख व प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. लोकसभा- विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते.

मात्र आज चार वर्षे झाली तरीही कोणालाही रोजगार अथवा रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झालेल्या नाहीत. याउलट आहे तो रोजगार अथवा नोकरी टिकविण्याचे मोठे आव्हान आजच्या युवकांसमोर निर्माण झाले आहे. नोटाबंदी व वस्तू व सेवा कर (जीएसटी) यामुळे संपूर्ण देशातील अनेकविध उद्योग व व्यापार बंद पडत चालले आहेत. त्यामुळे अनेक अभियांत्रिकी व अन्य शिक्षित युवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करीत कौशल्य विकास योजना आणली, त्या योजनेतूनही आजवर कोणाला रोजगार उपलब्ध झालेला नाही. इतकेच नव्हे, तर या योजनेतर्ंगत प्रशिक्षण देणार्‍या सुमारे सात हजार २५२ प्रशिक्षण संस्थांना अनुदान दिलेले नाही. परिणामी या प्रशिक्षण संस्थाही बंद पडत असून तिथे काम करणारे ५५ हजार कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. एकूणच या योजनेची अवस्था ‘ना रोजगार मागणारा जगला ना रोजगार देणारा जगला अथवा ना रोजगारासाठी प्रशिक्षण देणारा जगला’ अशीच झाली आहे. या वाढत्या बेरोजगारीला विविध क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाचे चुकीचेच धोरण कारणीभूत ठरले आहे.

याविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. याची सुरूवात दि. १ फेब्रुवारी रोजी सांगली येथून केली जात आहे. सांगली येथील या युवा आक्रोश मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते- पाटील करणार आहेत. या मोर्चात आमदार सुमन पाटील, श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती अनिता सगरे, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे- म्हैसाळकर, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा स्मिता पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरद लाड, रोहित पाटील व विराज नाईक आदी सहभागी होणार असल्याचेही भरत देशमुख व ताजुद्दीन तांबोळी यांनी सांगितले.