रिपाई केंद्र व राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत ?

रामदास आठवले यांनाही निश्चितपणे विचार करावा लागेल

सांगली: केंद्र व राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सर्वसामान्य जनतेचा पुरता अपेक्षाभंग झाला आहे. राज्यातील शिक्षण व्यवस्था धनिकांच्या हाती देऊन या नव्या ‘पेशवाई’ने बहुजन समाजाच्या मुळावरच घाव घातला आहे. संपूर्ण राज्यात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाही आता या सरकारमधूनबाहेर पडून रस्त्यावरची लढाई उभारण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे, असे प्रतिपादन रिपाईचे नूतन महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा सांगली महापालिकेचे नगरसेवक विवेक कांबळे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केले.

रिपाईच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबाबत विवेक कांबळे यांचा सांगली जिल्हा रिपाईच्यावतीने महापालिकेतील विरोधी स्वाभिमानी विकास आघाडीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे यांच्याहस्ते येथील शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी विवेक कांबळे बोलत होते.

bagdure

सर्वसामान्य जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपला केंद्र व राज्यात सत्ता देऊ केली. या सत्तेत मित्रपक्ष रिपाईचाही मोठा वाटा आहे. मात्र सत्तेत गेल्यानंतर या सरकारला सर्वसामान्यांना दिलेल्या वचनाचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. इंदू मिल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याची घोषणाही हवेतच विरली आहे. पेट्रोल व डिझेल दरात दिवसेंदिवस वाढच होत असून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आलेले आहेत. अनेकविध चुकीच्या निर्णयामुळे सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावलेल्या या सरकारने आता या सत्तेतून पायउतार व्हावे, असे आवाहनही विवेक कांबळे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाने अनेक प्राथमिक शाळा बंद करून बहुजन समाजाच्या प्रगतीवरच घाला घातला आहे. शिक्षण व्यवस्था धनिकांच्या हाती देऊन त्याआधारे शिक्षण क्षेत्राचा बाजार करणारे निर्णय घेऊन नव्याने ‘पेशवाई’ लादण्याचा प्रयत्न आहे. त्यातून बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. त्यामुळे या सरकारविरोधात बहुजन समाजात प्रचंड अस्वस्थता आहे. राज्य शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही बंद केली असून दलित समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. ‘भीमा- कोरेगाव’नंतर वादग्रस्त विधाने करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच जातीय तेढ निर्माण करू पहात आहेत. वास्तविक, या घटनेला १७ दिवस झाले तरी संबंधित चौकशी समितीच्या न्यायाधीशांचे नाव त्यांनी जाहीर केलेले नाही अथवा दंगलखोरांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अद्याप अटक झालेली नाही. या घटनेमुळे भाजपसमवेत राहणे योग्य नाही, अशी भावना संपूर्ण आंबेडकरी जनतेची झाली आहे. या जनभावनेचा रिपाई नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही निश्चितपणे विचार करावा लागेल, असे मतही विवेक कांबळे यांनी व्यक्त केले.

You might also like
Comments
Loading...