सांगली : ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला खिंडार

सांगली : जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा आशाताई पवार आणि काँग्रेस नेते दलीतमित्र श्री अशोक पवार यांनी आज समाज कल्याण मंत्री श्री दिलीपजी कांबळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला . आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालीच सांगलीचा विकास होऊ शकतो , त्यामुळे आम्ही भाजप मध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . यावेळी भाजप राज्य मागासवर्गीय आघाडीचे प्रमुख श्री सुभाष पारधी , प्रदेश उपाध्यक्षा सौ नीता ताई केळकर , नाना कांबळे , वीरेंद्र थोरात यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

दरम्यान सांगली महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान १ अॉगस्ट रोजी होत असून मतदानापुर्वीचा शेवटचा रविवार भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत सार्थकी लावला. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने तसेच सोमवारी सायंकाळी प्रचार थंडावणार असल्याने शहरातील उच्चभ्रू वसाहतीप्रमाणेच झोपडपट्ट्या, सोसायट्या अशा सर्वच भागात जास्तीत जास्त संख्येने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते धडपडत होते.

महापालिका निवडणुकीच्या मतदानापुर्वीचा शेवटचा रविवार रोड शो, बाइक रॅली, पदयात्रांसह मतदारांच्या घरोघरी जात वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत भाजपच्या उमेदवारांनी सार्थकी लावला. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने सकाळपासूनच भाजपच्या सर्वच उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह वॉर्डात फेरी मारून थेट मतदारांशी संवाद साधला. काही उमेदवारांनी तर सकाळी सहा वाजता प्रभागातील चहाच्या टपऱ्यांना भेटी देत टपऱ्यांवर येणाऱ्या नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. सुट्टी असल्याने भाजपचे युवक आणि महिला कार्यकर्तेही उत्साहाने प्रचारात सहभागी झाले होते.

रविवारी प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद वापरल्याने सकाळी प्रचाराचा जोर होता, तर दुपारी तो काही काळ थंडावला आणि पुन्हा चारनंतर प्रचाराने उसळी घेतली. शहरातील कामगार, व्यापारी, कष्टकरी, मुस्लीम, दलित अशी संमिश्र लोकसंख्या असलेल्या विविध भागात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार करत होते. याशिवाय घरोघरी जाऊन मतदारांना भाजपने सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी तयार केलेल्या नियोजित विकास आराखड्याची माहिती देत होते. पारंपरिक प्रचार पद्धतीसोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हायटेक प्रचारावरही भर दिला होता. प्रचाराचे क्षणाक्षणाचे अपटेडस, छायाचित्रे, फेसबुक पेज, वाॅट्सअॅप, आणि ट्वीटरसारख्या समाजमाध्यमातून व्हायरल केले जात होते. कार्यकर्त्यांच्या या प्रचार नियोजनाला मतदारांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

रॅलींचा  जोर
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने वाॅर्डात भाजपमय वातावरणाच्या निर्मितीसाठी बहुतांश भाजप उमेदवारांनी रॅलींचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या रॅलीजमध्ये युवक व महिलांची उपस्थिती तर लक्षणीय होतीच, सुट्टी असल्याने लहान मुलांचाही रॅलीमधील समावेश उत्साही होता.Loading…
Loading...