…तर महादेव जाणकरांच्या दारात दुध ओतणार ; संघर्ष समितीचा इशारा

महादेव जानकर

अकोले: दुधाच्या पडत्या भावासंदर्भात तातडीने हस्तक्षेप करा, दुधाचा रास्त उत्पादक खर्च विचारात घेत गायीच्या दुधाला किमान ५०/- रुपये व म्हशीच्या दुधाला ६५/- भाव द्या, अन्यथा दुग्धविकास मंत्री महादेव जाणकर यांच्या दारात दुध ओतू, अशा इशारा दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात येत आहे. दुधाचे भाव आज अत्यंत न्यूनतम पातळीवर येऊन पोहचले आहेत. महिनाभरात दुध दरात दहा रुपयांची घसरण झाली आहे. शासनाचे दर पत्रक धाब्यावर बसवून दुधाला अत्यल्प भाव दिला जात आहे.

शेतक-यांना लिटर मागे दहा रुपये कमी दिले जात असताना शहरात मात्र ग्राहकांना दुध विकताना एक रुपयाही भाव कमी झालेला नाही. ग्राहकांना जुन्याच दराने दुध विक्री होत आहे. मग लिटर मागे हे दहा रुपये कोणाच्या खिशात जात आहेत असा रास्त सवाल दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने उपस्थित केला आहे.
शासनाने दिनांक २१ जून रोजी परिपत्रक काढून, शेतक-यांना ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ. इतक्या गुणवत्तेच्या दुधाला प्रतिलिटर २७/- रुपये भाव देणे बंधनकारक केले आहे. असे असताना आज या गुणवत्तेच्या दुधाला १८/- रुपया पर्यंत कमी भाव मिळत आहे. दुधाचा उत्पादन खर्चही यातून भरून निघत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी यामुळे हैराण झाले आहेत. दुधाचे खरेदी दर लिटर मागे दहा रुपयांनी कमी झाले असताना शहरात ग्राहकांना मात्र जुन्याच दराने दुध खरेदी करावे लागत आहे.

दुधापासून बनविल्या जाणा-या पदार्थ व उपपदार्थांच्या विक्री दरातही काहीच फरक पडलेला नाही. शेतक-यांना लिटर मागे दहा रुपयांचा तोटा होत असताना शेतक-यांकडून दुध खरेदी करणा-या दुध संघ व कंपन्यांच्या नफ्यात मात्र भरघोस वाढ झाली आहे. शेतकरी व ग्राहक दोघांना लुटून ते आपले खिसे भरत आहेत. शेतकरी व ग्राहक दोघांची लुट चालली असताना दुग्धविकास मंत्री शांत बसणार असतील तर त्यांना जाग आणण्यासाठी राज्यभरातील शेतकरी त्यांच्या दारात दुध नेऊन ओततील असा इशारा दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.