‘संदिप क्षीरसागरांना साधी नालीही बांधता आली नाही’

बीड : बीड नगर पालिकेच्या निवडणुकीला आणखीन वेळ आहे. मात्र, आतापासूनच विकासकामांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप होत असल्याचे दिसतेय. शहरातील कंकालेश्वर मंदिर ते शहंशाहवली दर्गा या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे देखील लवकरच हाती घेऊन पूर्ण केले जातील त्यामुळे आता विकासकामे करणाऱ्यांना स्थानिकांनी साथ दिली पाहिजे. विरोधक मात्र येथे साधी नाली देखील करू शकले नाहीत. त्यांनी फक्त मोठमोठी आश्वासने या भागातील नागरिकांना दिल्याची टीका नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे आमदार संदिप क्षीरसागर यांच्यावर नाव न घेता टीका केली.

बीड पालिकेत डॉ.भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचे पुतने आ.संदिप क्षीरसागर असे दोन गट आहेत. नुकतेच संदिप क्षीरसागर समर्थकांनी काकू नाना विकास आघाडीला रामराम करत जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून क्षीरसागर घराण्यातील काका-पुतणे एकमेकांवर आक्रमक टीका करताना दिसत आहेत.

नुकतेच बीड शहरातील शहंशाहवली दर्गा ते वीरशैव समाज स्मशानभूमी मार्ग मार्गे मिल्लतनगर या सुरू असलेल्या सिमेंट रस्ता कामाची नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पाहणी केली. गेल्या महिन्यातच या ठिकाणी त्यांनी भेट देऊन येथील समस्येबाबत स्थानिकांशी व येथे लिंगायत समाज, वडार समाज, ढोर समाज, चर्मकार समाजाची स्मशानभूमी असल्याने त्या समाजाने प्रामुख्याने हा रस्ता करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी संबंधीत यंत्रणेला सुचना देऊन तातडीने हे काम पूर्ण करण्याचे सांगितले होते. त्यानुसार कामास सुरूवात केल्यामुळे मिल्लतनगर व सर्व समाजाच्या नागरीकांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, कंकालेश्वर मंदीर ते शहंशाहवली दर्गा हा सिमेंट रस्ता दर्जेदारपणे पूर्ण केला असून उर्वरीत विकास कामे लवकरच हाती घेण्यात येतील. विरोधक मात्र येथे साधी नाली देखील करू शकले नाहीत. त्यांनी फक्त मोठ मोठी आश्वासने या भागातील नागरीकांना दिली. त्यामुळे आता विकास कामे करणाऱ्यांच्या पाठीशी ताकत उभी केली पाहिजे.

महत्त्वाच्या बातम्या