वाळूअभावी विकासकामे थांबली !

सोलापूर – चालू २०१७-१८ वर्षामध्ये ३५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. काही कामे सुरू करण्यासाठी आदेशही दिले आहेत. ती वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. जी कामे वाळूमुळे रखडली आहेत, त्या कामांना जिल्हा प्रशासनाने तातडीने वाळू उपलब्ध करून द्यावी. यामध्ये जप्त केलेली वाळू उपलब्ध करावी, ती मिळाल्यास कृत्रिम वाळूचा वापर करून कामे पूर्ण करावीत, असे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज जिल्हा प्रशासनास दिले.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात झालेल्या या बैठकीस उपायुक्त उत्तम चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील चंद्रभागा नदीपात्रातील घाटाचे काम वाळूअभावी थांबले असल्याचे सांगण्यात आले.

यावर जिल्हा प्रशासनाने जप्त केलेली वाळू बांधकामास उपलब्ध करून द्यावी अथवा कृत्रिम वाळूचा वापर करून बांधकाम पूर्ण करण्यावर भर द्यावा. येत्या पंधरा दिवसांत घाटाचे काम सुरू करण्याचे आदेश दळवी यांनी दिले. पंढरपूर विकास आराखड्यात मंजूर असलेला पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या खुल्या जागेवर नवीन व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा. जिल्ह्यातील पालखी तळांचा विकास करण्यासाठी जमिनीचे संपादन करा. ही प्रक्रिया गतीने केली जावी, असे त्यांनी सांगितले.

६५ एकर परिसरात बांधण्यात येणारे सभागृह रद्द करण्यात यावे, असे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले. यावर नगरपालिकेच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या बहुउद्देशीय सभागृहामुळे ६५ एकर जागेतील सभागृह उभारले जाऊ नये, असे दळवी यांनी सांगितले. याबाबत उपविभागीय अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, कार्यकारी अभियंता यांनी एकत्रित पंढरपुरातील नगरपालिकेच्या विकासकामांबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही दिली.

You might also like
Comments
Loading...