हिंदूंच्या हत्यांवर मौन व कम्युनिस्टांच्या हत्यांवर गदारोळ, हे दांभिक पुरोगामित्व – सनातन संस्था

मुंबई: ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना आता सनातन संस्थेकडून देखील प्रतिक्रिया आली आहे .लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली यात भाषणे करताना मुख्यतः सनातन संस्था अथवा हिंदुत्ववादी संघटनांनीच ही हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला.हिंदूंच्या हत्यांवर मौन व कम्युनिस्टांच्या हत्यांवर गदारोळ, हे दांभिक पुरोगामित्व असल्याची टीका सनातन कडून करण्यात आली आहे .

डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गीनंतर लंकेश यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. बंगळुरू पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. लंकेश यांची हत्या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी केला असल्याचा आरोप पुरोगामी संघटनांकडून करण्यात येत आहे . सनातन संस्थेने देखील लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला आहे तसेच त्यांच्यावर केले जात असलेले आरोप देखील फेटाळून लावले आहेत .

सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांची प्रतिक्रिया
हिंदुत्ववादाला बदनाम करण्यासाठी मिळेल ती संधी साधायची, ही कम्युनिस्टांची नेहमीचीच खेळी आहे. कर्नाटकासह दक्षिण भारतात चालू असलेल्या सदर्न जिहादच्या नावाखाली हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करून केल्या जात असलेल्या हत्यांविषयी आजही तथाकथित पुरोगामी मूग गिळून गप्प का आहेत ? हत्या कोणाचीही असो, ती निषेधार्हच आहे; पण पुरोगामी विचारवंतांच्या हत्या या मानवतेमध्ये बसणाऱ्या असतात आणि हिंदुत्ववादी विचारवंतांच्या हत्या मानवतेच्या दृष्टीकोनात बसत नाहीत, असे का ? हिंदूंच्या हत्यांवर मौन बाळगून कम्युनिस्टांच्या हत्यांवर गदारोळ करणे, हे दांभिक पुरोगामित्व असल्याची टीकाही करत या तथाकथित मानवतावादी दृष्टीकोनाचाही निषेध सनातन संस्था करत आहे .दाभोलकरांची हत्या झाली, तेव्हाही एका तासाच्या आत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही हत्या नथुरामी प्रवृत्तींनी केली असे म्हणत तपासाची दिशा भरकटवली. आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनीही ही चूक करू नये अन्यथा दाभोलकरांचे खरे मारेकरी जसे पळून गेले, तसेच गौरी लंकेश हत्या प्रकरणात होईल. पोलिसांवर कोणताही दबाव न आणता त्यांना मुक्तपणे तपास करू द्यावा. एका वाहिनीवर उमा पानसरे यांनी समीर गायकवाडला जामीन मिळाल्यामुळे गौरी लंकेश यांची हत्या झाली असे म्हटले आहे. कोणताही तपास झाला नसतांना असे विधान त्यांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारे केले, हे त्यांनी स्पष्ट करावे. अशी बिनबुडाची विधाने प्रसिद्धीच्या झोतात रहाणारी राजकीय मंडळी करत असतात. तरी भाकपच्या नेत्या उमा पानसरे यांनी याचे पुरावे जनतेसमोर मांडावेत, असेही श्री. राजहंस यांनी म्हटले आहे