fbpx

Samsung Galaxy S8- भारतात सॅमसंग गॅलक्सी S8 आणि S8 प्लस लाँच

सॅमसंगने आपले गॅलेक्सी एस ८ आणि गॅलेक्सी एस ८ प्लस हे दोन फ्लॅगशीप स्मार्टफोन भारतात अनुक्रमे ५७९०० व ६४९०० रूपये मुल्यात लाँच केले असून याची नोंदणी सुरू झाली आहे.

गॅलेक्सी एस ८ आणि गॅलेक्सी एस ८ प्लस या दोन्ही मॉडेल्सची फ्लिपकार्ट तसेच सॅमसंग कंपनीच्या संकेतस्थळावर अगावू नोंदणी सुरू झाली आहे. हे मॉडेल्स ग्राहकांना प्रत्यक्षात ५ मे पासून मिळण्यास प्रारंभ होणार असल्याचे आज कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या दोन्ही मॉडेल्समध्ये इन्फीनिटी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात कडांचा वापर न करता मोठ्या डिस्प्लेचा वापर करता येणार आहे. गॅलेक्सी एस ८ मध्ये ५.८ आणि तर एस ८ प्लस या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचे आणि २९६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतांचे डिस्प्ले असतील. युएचडी अलायन्सतर्फे या डिस्प्लेला ‘मोबाईल एचडीआर सर्टीफिकेशन’ प्रदान करण्यात आले आहे हे विशेष. या डिस्प्लेमध्ये व्हिडीओजसाठी जास्त जागा मिळणार असून युजरला कमी वेळेस स्क्रोलींग करावी लागणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ या मॉडेलमध्ये डिस्प्लेच्या खाली अदृश्य ‘होम’ हे बटन असणार आहे. हे मॉडेल अतिशय आकर्षक अशा पाच रंगांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. कॅमेर्‍यांचा विचार करता सॅमसंग गॅलेक्सी एस ८ या मॉडेलच्या फ्रंट कॅमेर्‍यामध्ये स्मार्ट ऑटो-फोकस हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाचे सेल्फी घेता येईल असा कंपनीने दावा केला आहे. हे दोन्ही मॉडेल्स वॉटर आणि डस्टप्रुफ असतील. यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर असून तो आधीच्या मॉडेलपेक्षा १० टक्के अधिक गतीमान असणार आहे. दोन्ही मॉडेल्सची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असेल. यासोबत मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्टदेखील प्रदान करण्यात आला आहे.

या दोन्ही मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, आयरिस रेकग्नीशन आणि फेस रिकग्नीशन या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. याच्या मदतीने कुणीही गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या मॉडेल्सला लॉक/अनलॉक करू शकेल. यातील फेस रिकग्नीशन हे अधिक उत्तम दर्जाचे असल्याचा कंपनीने दावा केला आहे. याशिवाय यात ‘सॅमसंग पास’ या नावाचे पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप असेल. याच्या मदतीने विविध अ‍ॅप्सच्या पासवर्डचे अधिक चांगल्या पध्दतीने व्यवस्थापन करता येणार आहे. यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे अनुक्रमे १२ आणि ७ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत. वायरलेस चार्जिंगसह या दोन्ही मॉडेलमध्ये अनुक्रमे ३००० आणि ३५०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटर्‍या प्रदान करण्यात आल्या आहेत.