Samsung- सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो पाच हजारांनी स्वस्त

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी सी ९ प्रो या मॉडेलचे मूल्य पाच हजार रूपयांनी कमी केले असून हा स्मार्टफोन आता ३१,९०० रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो हे मॉडेल या वर्षाच्या जानेवारी महिन्यात लाँच करण्यात आले होते. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये ग्राहकांना ३६,९०० रूपयात उपलब्ध करण्यात आले होते. याच्या मूल्यात आता तब्बल पाच हजारांची घसघशीत सुट प्रदान करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या दोन्ही ई-पोर्टलसह शॉपीजमध्येही याच मूल्यात हे मॉडेल ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो या मॉडेलमध्ये 6 इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले असेल. यात अत्यंत गतीमान असा ऑक्टॉ-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६५३ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम सहा जीबी आणि स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने तब्बल २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. या मॉडेलमधील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे हे प्रत्येकी १६ मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. फास्ट चार्जिंगसह यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली असून यात फिंगरप्रिंट स्कॅनरही असेल. सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असेल. याशिवाय यात वाय-फाय, जीपीएस, एनएफसी, ब्ल्यु-टुथ, युएसबी टाईप-सी पोर्ट आदी फिचर्स असतील.