योगी आदित्यनाथ ‘संजू’च्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा- भाजपकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून, याचाच एक भाग म्हणून, आता पक्षाकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान हाती घेण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभिनेता संजय दत्त याची भेट घेतली.संपर्क फॉर अभियानात भाजपचा मुख्य फोकस आहे बौद्धिक वर्तुळावर. विशेषतः या वर्तुळावर डाव्या विचारांचा प्रभाव अधिक आहे.

सरकारविरोधात जास्तीत जास्त ओरड करणारा, संघाच्या विचारसरणीला घातक मानणारा हाच वर्ग आहे. चित्रपट कलावंत, साहित्यिक, न्यायमूर्ती, प्राध्यापक अशा वर्गामध्ये भाजपला ताकदीचे उजवे समर्थक मिळत नाहीत. त्यामुळेच कदाचित या माध्यमातून आपली विचारसरणी ठसवण्याचा हा पक्षाचा प्रयत्न आहे.

काय आहे भाजपचे ‘संपर्क फॉर समर्थन अभियान’
हे अभियान म्हणजे संघाने भाजपला दिलेला कानमंत्र आहे. इंग्लंडमध्ये मजूर पक्षाने आपल्या कामगिरीचं परीक्षण करण्यासाठी लिस्टन टू ब्रिटन्स किंवा लेबर पार्टी लिसन्सचा ऐतिहासिक प्रयोग केला होता. त्याच धर्तीवर देशाच्या विविध क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी त्यांना अगदी घरी जाऊन भेटायचं, त्यांची सरकारबद्दलची मतं जाणून घ्यायची, असा हा कार्यक्रम आहे. सध्या बौद्धिक वर्तुळात सरकारची जी निगेटिव्ह प्रतिमा बनत चाललीय ती पुसून काढण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आपल्या पक्षाला, आपल्या विचारसरणीला कशी सर्व स्तरांमध्ये स्वीकृती आहे, हे दाखवण्याचाच हा प्रयत्न.