एनसीबीने जावयाला अडकवल्याच्या नवाब मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

sameer-nawab

मुंबई : राज्यात सध्या एनसीबीने क्रूजवर टाकलेला छापा, त्यातून अटक करण्यात आलेला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि या सर्व प्रकरणावर राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप या विषयांवर सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आज देखील नवाब मलिक यांनी आपला जावई समीर खान याला एनसीबीने अडकवल्याचा आरोप केला. यानंतर आता समीर वानखेडे यांनी मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

मलिक यांनी आज पत्रकार परिषदेमधून समीर वानखेडे आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. ‘कोर्ट ऑर्डरमध्ये म्हटलंय की २०० किलो गांजा मिळालेला नाही. फक्त शाहिस्ता फर्निचरवालाकडे ७.५ ग्राम गांजा मिळाला. बाकी सगळं हर्बल टोबॅको आहे असे रिपोर्टमध्ये आल आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की एवढ्या मोठ्या एनसीबीसारख्या एजन्सीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्यकारक आहे. या एजन्सींकडे इन्स्टंट टेस्टिंगचं किट असतं. ज्यातून अंमली पदार्थ आहे किंवा नाही हे लगेच समजतं. याचा अर्थ त्यांनी या सर्व गोष्टी तपासल्या, गांजा नव्हता. पण तरी लोकांना अडकवण्यात आलं. २७ अ चं कलम लागूच होत नाही. शाहिस्ता फर्निचरवालावर खटला दाखल होतो. पण तिला त्याच दिवशी जामीन देण्यात आला. रिया चक्रवर्ती प्रकरणात देखील करण सजनानीला गुंतवलं. राहिला फर्निचरवाला या आरोपीला देखील गुंतवलं. रिया चक्रवर्ती प्रकरणातल्या एका आरोपीला या प्रकरणात टाकलं’ असे मलिक म्हणाले.

दरम्यान, यासंदर्भात पत्रकारांशी समीर म्हणाले की,’हे प्रकरण सध्या वरच्या कोर्टात आहे. अशा प्रकरणामध्ये आपण त्यावर काही बोलू शकत नाही.’ नवाब मलिक यांनी वानखेडेंचा नंबर पत्रकार परिषदेत जाहीर केल्याबद्दल ते म्हणाले, ‘माझा नंबर जाहीर केला, हरकत नाही, ती त्यांची इच्छा आहे.’

महत्त्वाच्या बातम्या