समीर वानखेडेंना ‘या’ व्यक्तीचे मार्गदर्शन; पत्नी क्रांती रेडकरचा खुलासा

SMIR VANKHEDE

मुंबई :  गेल्या वर्षभरापासून बॉलीवूड ड्रग्ज प्रकरणांमुळे चर्चेत आहे. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर बॉलीवूड ड्रग्ज प्रकरण उघडकीस आलं होत. त्यानंतर एनसीबी सातत्याने बॉलीवूडवर निशाण साधून धडक कारवाई करताना दिसत आहे. या कारवाईत एनसीसीबीने मोठ्या कलाकारांची चौकशी देखील केली होती. आता अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आणणारे केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे. याच प्रकरणी समीर वानखेडे यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने त्यांच्या करिअरमागे असलेल्या मोठ्या व्यक्तीचा खुलासा केला आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत क्रांती म्हणाली, “समीर तणावाखालीसुद्धा चोख काम करू शकतो. त्याला त्या गोष्टींची सवय आहे. आपल्या ऐतिहासिक नेत्यांचा आदर्श त्याने समोर ठेवला आहे. त्यांच्या इतिहासाशी तो खूप जोडलेला आहे. विविध जागतिक नेत्यांच्या कामगिरीबाबत वाचून तो मोठा झाला आहे. एखादी समस्या त्याला सतावत असेल किंवा एखादा निर्णय घेण्याबाबत त्याच्या मनात संभ्रम असेल तर तो त्याच्या वडिलांशी संपर्क साधतो. त्याचे वडील हे त्याच्या कारकिर्दीत एखाद्या मार्गदर्शक प्रकाशासारखे आहेत”, असं क्रांती पुढे म्हणाली.

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत  त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे त्यांनी आतापर्यंत इतके मोठे यश संपादन केले आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांच्यावर बेकायदेशीर पद्धतीनं पाळत ठेवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलातील काही पोलीस साध्या वेशात वानखेडेंवर पाळत ठेवत असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेटही घेतली होती. या प्रकरणामुळे सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

महत्वाच्या बातम्या