हायकोर्टाकडून समीर वानखेडेंना दिलासा, अटक करण्यापूर्वी तीन दिवस अगोदर नोटीस द्यावी लागणार

हायकोर्टाकडून समीर वानखेडेंना दिलासा, अटक करण्यापूर्वी तीन दिवस अगोदर नोटीस द्यावी लागणार

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात काही तक्रारी दाखल झाल्यामुळे मुंबई पोलिस अटक करतील अशी भीती वानखेडेंना आहे. त्याविरोधात समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांना तूर्तास दिलासा दिला आहे. कुठल्याही प्रकारचा एफआयर दाखल करण्यापूर्वी किंवा अटकेची कारवाई करण्यापूर्वी तीन दिवस आधी वानखेडे यांना नोटीस दिली जावी. वानखेडे यांच्यावर तूर्तास कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालायाने राज्य सरकारला दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी बोगस प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळविल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांची काही कागदपत्रेही मलिक यांनी समोर आणली होती. त्यानंतर वानखेडेंच्या विरोधात मुंबई पोलिसांत ४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यावर मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी एक समिती तयार केली होती. पण, एनसीबीकडून चौकशी सुरू असताना आता मुंबई पोलिसांकडून चौकशी का? असा प्रश्न उपस्थित करत वानखेडेंनी न्यायालयात धाव घेतली होती.

‘आम्ही कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही एजन्सीसमोर चौकशीसाठी हजर होण्यास तयार आहोत. राज्य सरकारकडून आमच्याविरोधात एक मोहीम राबवण्यात येत आहे आणि त्या मोहिमेअंतर्गतच एफआयआर दाखल न करताच एक एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, अशी भूमिका समीर वानखेडे यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात मांडली.

त्यानंतर सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना ‘समीर वानखडे यांना अटक करण्यापूर्वी तीन दिवस आधी नोटीस देऊ’ असे सांगितले. हे सरकारी वकिलाने सांगितल्याने न्यायालयाने याचिका निकालात काढली. तूर्तास राज्य सरकारने कुठलीही कठोर कारवाई करू नये आणि अटक करायची असेल तर तीन दिवसांपूर्वी कळवावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांना राज्य सरकारच्या कारवाई तूर्तास का होईना दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या