‘संजयजी,खोट्या बाबींवर तुम्ही राजकारण करत असाल, तर…’; संबित पात्रांचा पलटवार 

sambit patra vs sanjay raut

नवी दिल्ली- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची आश्चर्यजनक माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे कोरोनाच्या काळातील मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मृत्युची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करतात. या आकडेवारीनुसार ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे.

आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीत म्हटले आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नसल्याचा दावा केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.सरकारच्या या उत्तरावर शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान,भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एका पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.संजय राऊतांना कदाचित पूर्ण माहिती नाही. संजय राऊत म्हणत होते की आम्हाला धक्का बसला. अशा मृत्यूंमुळे धक्का बसलाच पाहिजे. पण खोट्या बाबींवर तुम्ही राजकारण करत असाल, तर आम्हाला धक्का बसला आहे. तुम्ही अशा विषयांवर राजकारण करत आहात, या शब्दांत संबित पात्रा यांनी पलटवार केला.

महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झालेला नाही, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्याच नातेवाईकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली होती. यावर राज्य सरकारने उत्तर दिले आहे, असेही पात्रा यांनी नमूद केले.

दुसऱ्या बाजूला राऊत यांच्या या मागणीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाष्य केले आहे. केंद्रावर दावा दाखल करण्याआधी राज्य सरकारने किती ऑक्सीजन प्लांट उभे केले हे जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. आम्ही विधानपरिषदेच्या सभागृहामध्ये सरकारला इशारा दिला होता की कोरोनाची जर दुसरीलाट आली तर ऑक्सीजनचा तुटवडा जाणवेल व ऑक्सीजन अभावी लोक किड्यामुंगी सारखे मरतील. तरी सुद्धा सरकार गाफील राहिले असा घणाघात खोत यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP