fbpx

फिट राहायचं आहे तर रायगडावर पायी चला – खा. संभाजीराजे

Sambhaji Raje Bhosale

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे: क्रीडा मंत्री राजवर्धनसिंह राठोड यांनी २२ मे रोज #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगने #FitnessChallenge मोहीम सुरु केली. त्यांनी मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी मंडळींना त्यांचे फिटनेस फोटो व व्हिडीओ पोस्ट करण्यास सांगितले. त्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, प्रसिद्ध चित्रपट अभिनेता ऋतिक रोशन यांचा समावेश होता.

त्यांनी ते पोस्ट पण केले, त्यापैकी विराट कोहलीने स्वतःच्या फिटनेसचा व्हिडीओ पोस्ट करून तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याची पत्नी अनुष्का शर्मा, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना टॅग करत त्यांना पण आव्हान केले. त्यापैकी परत सोशल मीडियावरील ट्विटरवर सक्रिय असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा करत असतानाचे फोटो पोस्ट केले. विराटच्या पत्नीने पण फोटो पोस्ट केले.

#HumFitTohIndiaFit या हॅशटॅगने सुरु झालेल्या #FitnessChallenge मोहिमेत महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या ट्विटने भल्या भल्यांना विचार करायला भाग पाडले असून, ज्यांना ज्यांना आव्हान केले आहे असे सर्वच जण विचारत पडले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी आपले फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता आमीर खान, अक्षयकुमार, अजय देवगनसह आणखीही काही सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना दिले आहे. हे फिटनेस चॅलेंज राजकारण्यांसाठी तर चांगलेच अडचणीचे ठरले आहे. कारण ते चॅलेंज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा दिनी राजधानी किल्ले रायगड पायी चढण्याचे!

खासदार छत्रपतींच्या या ट्विटमुळे अनेकांची चांगलीच गोची झाली आहे. दरवर्षी ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी किल्ले रायगडावर साजरा केला जातो. खासदार छत्रपती संभाजी स्वत: त्यासाठी सक्रीय पुढाकार घेतात. यावेळी त्या सोहळ्यासाठी स्वत: आणि शिवभक्तांचा पायी चालत रायगडावर जातानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओसोबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड, किरण रिजिजू, काँग्रेस नेते ज्योतिर्रादित्य शिंदे, अभिनेता आमीर खान, अक्षयकुमार, अजय देवगन, रितेश देशमुख यांनाही मेन्शन करत आव्हान दिले आहे.

५ जून रोजी दुपारी तीन वाजता माझ्यासोबत किल्ले रायगडावर चला असे त्यांनी सुचवले आहे.’हम फिट तो इंडिया फिट’ हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी छत्रपतींनी दिलेले हे फिटनेस चॅलेंज स्वीकारणे अनेकांसाठी सोपे नाही. अतिशय अवघड व पायथ्यापासून माथ्यापर्यंत पंधराशेपेक्षा जास्त पायऱ्या चढत किमान अडीच तासांचा पायी प्रवास करावा लागतो.