संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून अवयवदानाचा संकल्प

Sambhaji-Patil-Nilangekar

लातूर : अवयवदान काळाची गरज निर्माण झालेली असून अवयवदान जागृती मोहिम शासनाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. लातूर जिल्हयात गेल्या काही दिवसापूर्वी किरण लोभे या तरुणाने अवयवदान चळवळीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. अवयवदानाची चळवळ आगामी काळात लोकचळवळ बनावी याकरिता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे. पालकमंत्री निलंगेकरांनी आज अवयवदानाचा संकल्प करुन त्या संबंधीचा अर्ज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे सुपूर्द केलेला आहे. पालकमंत्र्यांनी आधी केले मग सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हयात अवयवदानाची चळवळ निश्‍चितच लोकचळवळ बनेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य शासन महाअवयव दान मोहिम संपूर्ण राज्यभरात राबवित असून या मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला जात आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना विविध अवयव यांचे रोपण करून त्यांना एक चांगले जीवन जगण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अवयव दान करण्याचा संकल्प करून त्याबाबतचा अर्ज भरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्याकडे देण्यात आला. केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे, या म्हणीनुसार स्वतः पालकमंत्र्यांनी अवयवदानाचा संकल्प केला असल्याने ते आता हक्काने दुसर्‍यालाही संकल्प करावा असे सांगू शकतील. यावेळी पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, महाअवयव दान मोहिमेत लातूर जिल्हयामध्ये काम कौतुकास्पद आहे. यात आरोग्य विभागाने ही सक्रीय सहभाग घेऊन चांगले काम केले आहेत. त्यामुळे ही मोहिम सर्वसामन्य नागरिकांपर्यंत पोहोचले आहे.