संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला दहा लाखांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले

टीम महाराष्ट्र देशा – संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला दहा लाख रुपयांची खंडणी घेताना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी स्वीकारताना सुयोग गजानन औंधकर (वय ४०, रा. कासेगाव, ता. वाळवा) यास रंगेहात पकडण्यात आले. औंधकरचा साथीदार व माहिती अधिकारी कार्यकर्ता कृष्णा विश्वनाथ जंगम (रा. वाळवा) याचे नाव निष्पन्न झाले आहे. त्यालाही रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे माहिती अधिकार कायद्याच्या मुखवट्याआडून चालणारी खंडणीखोरी चव्हाट्यावर आली आहे.

साखर कारखाना निवडणुकीतील उमेदवार अर्जांची प्रसिद्धी नोटीस बोर्डावर का लावली नाही, यात आपण पदाचा गैरवापर करत आहात अशी माहिती, ‘माहितीच्या अधिकारा’त मागवून १० लाखांची खंडणी स्वीकारताना औंधकरला अटक केली. या निवडणुकीत भूसंपादन अधिकारी तुषार ठोंबरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले होते. तसेच सहायक निबंधक अमोल डफळे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी होते.

औंधकर आणि जंगम यांच्या ‘ब्लॅकमेलिंग’ला वैतागलेल्या डफळे यांनी २८ जानेवारी २०१९ रोजी औंधकर यास कार्यालयात बोलावून घेतले. ‘तुम्ही ज्या तक्रारी करीत आहात, त्यात तथ्य नाही’, असे सांगितले. मात्र तरीही औंधकरने हे प्रकरण मागे घेण्यासाठी पैशाची मागणी केली.

सहायक निबंधक कार्यालयातील कक्ष अधिकारी काळेबाग यांच्याकडे औंधकरने स्वत: लिहून दिलेल्या चिठ्ठीत रावळ, ठोंबरे, चौधरी व डफळे या प्रत्येकांनी अडीच लाख रुपये द्यावेत, असा मजकूर होता.

पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही कारवाई केली. पिंगळे यांच्या पथकाने निबंधक कार्यालय परिसरात सापळा लावला. औंधकरने खंडणीची रक्कम घेताच त्याला पकडले.