“पुरंदरेंच्या शिवसृष्टीला आर्थिक मदत करून सरकार महाराजांची बदनामी केल्याचं बक्षीस देत आहे का?”

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला केंद्र सरकारकडून पाच कोटींची मदत मिळणार आहे. या आगोदर राज्य सरकारकडून ३०० कोटी रुपये या कामासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बाबासाहेब पुरंदरे पुण्यातील कात्रज भागात उभारत असलेल्या शिवसृष्टीला नितीन गडकरी यांच्या खात्याकडून जेएनपीटी अंतर्गत पाच कोटी रुपयांचा चेक देण्यात येणार आहे. शनिवारी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमाला नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा चेक प्रदान करण्यात येणार आहे मात्र संभाजी ब्रिगेडने या कार्यक्रमाला आपला विरोध दर्शविला आहे.

शिवरायांची बदनामी ज्या बाबासाहेब पुरंदरे यांनी केली त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिल्यामुळे शिवप्रेमी संघटना नाराज आहेत आता सरकार पुरंदरेंच्या शिवसृष्टीला भरीव आर्थिक मदत करून सरकार महाराजांची बदनामी केल्याचं बक्षीस देत आहे का? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी उपस्थित केला आहे. आम्ही या कार्यक्रमाला लोकशाहीच्या मार्गाने विरोध करू . काहीही झाले तरी आम्ही पुरंदरे यांची शिवसृष्टी होऊ देणार नाही असा इशारा शिंदे यांनी महाराष्ट्र देशा बरोबर बोलताना दिला.

दरम्यान यापूर्वी सरकारकडून ३०० कोटी रुपये या कामासाठी देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली आहे. यानंतर काही संघटना तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला विरोध दर्शविला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर याच मुद्द्यावरून टीका केली होती. पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला सरकारकडून करण्यात येणारी मदत हि पुणेकरांची फसवणूक असल्याची टीका अजित पवार यांनी केली होती .

आ.जितेंद्र आव्हाड यांनी देखील शिवसृष्टीला आपला विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारने पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला असला तरी त्यांच्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी ३०० कोटींचा निधी आम्ही देऊ देणार नाही. इतिहासाला साजेशी शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमायला हवी. पुरंदरे यांची शिवसृष्टी उभी राहू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.