कॉंग्रेसकडून वेळकाढूपणा होतोय : संभाजी ब्रिगेड

पुणे : संभाजी ब्रिगेडने राज्यातील ४८  पैकी ११  लोकसभा मतदारसंघासह माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ब्रिगेडला सोबत घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ‘२ महिने नुसत्या चर्चा करून आम्हाला झुलवत ठेवले आणि आमचा विश्वासघात केला’ अशी टीका संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या १८  जागा लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे.

दरम्यान,कॉंग्रेसवर संभाजी ब्रिगेडने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर येत आहे. महाआघाडीचा घटक होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या स्वभिमानीलादेखील कॉंग्रेसने असंच झुलवत ठेवलं आहे. अश्याच वागणुकीचा सामना वंचित बहुजन आघाडीला देखील करावा लागला. शेवटी वैतागून वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार केला आहे.

कोणत्या प्रमुख मतदारसंघांवर आहे ब्रिगेडची नजर

माढा, सोलापूर, औरंगाबाद, बुलढाणा,शिरूर, पुणे या प्रमुख लोकसभा मतदारसंघांवर ब्रिगेडने लक्ष केंद्रित केले आहे.