fbpx

मतांच्या राजकारणासाठी उदयनराजेंचा ‘भिडेंना’ पाठींबा – संभाजी ब्रिगेड

bhide guruji and udhanraje bhosle

पुणे : श्री शिवप्रतिष्ठान संघटनेने भीमा कोरेगाव हिंसाचरात बामसेफ व संभाजी ब्रिगेड आणि पुण्यातील एल्गार परिषदेच्या निमंत्राकांचा हात असल्याचा गंभीर आरोप आज पत्रकार परिषदेत केला. मात्र संभाजी ब्रिगेड पुण्याचे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. आज पर्यंत ज्यांचावर दंगली करण्याचे व भडकवण्याचे आरोप आहेत त्या हिंदुत्ववादी संघटनांनी आमच्यावर आरोप करू नये असं म्हटले आहे. तसेच भिडे गुरुजींच्या बचावासाठी भूमिका घेतल्याबद्दल छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर देखील टीका केली आहे. त्यांनी मतांच्या राजकारणासाठी किंवा त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःच राजकारण डोळ्यासमोर ठेवून भूमिका घेतली असल्याचे सांगितले.

काय म्हणाले संतोष शिंदे

आज पर्यंत ज्यांचावर दंगली करण्याचे व भडकवण्याचे आरोप आहेत त्या हिंदुत्ववादी संघटनांनी आमच्यावर आरोप करू नये. संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी आहे. ज्यांनी कोणी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. वढू मधील गोविंद गायकवाडांची समाधी तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांची चौकशी करूनं कठोर कारवाई करावी.

छत्रपती उदयनराजे भोसले हे त्या भागातील खासदार आहेत. मतांच्या राजकारणासाठी किंवा त्यांच्या वयक्तिक स्वार्थासाठी स्वतःच राजकारण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भूमिका घेतली असेल. छत्रपती शिवाजी महराज अथवा संभाजी महाराज यांच्या चरित्र आणि चारित्र्य हननाचा ज्या ज्या वेळी विषय येतो त्या वेळी ते गप्प बसतात. मात्र आता उदयन महाराज बोलत आहेत हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. हा विषय जो आहे तो पूर्ण इतिहासाशी निगडीत असून इतिहासातील वाद मिटवायचे असतील तर इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची आवश्यकता आहे. तज्ञ इतिहासकारांची समिती नेमून पुनर्लेखन करावे हि मागणी संभाजी ब्रिगेडची आहे.

आमच्यावर आरोप करणे हा हिंदुत्ववादी संघटनांचा पळकुटेपणा आहे. पोलीस तपासातूनच यांच खरं रूप समोर येणार असून लोकांच प्रबोधन करण्याचं काम यापुढेही करत राहणार आहोत. पोलिसांना पूर्णपणे आम्ही सहकार्य करू. मुख्यमंत्र्यांकडून जी न्यायाधीशांची चौकशी समिती गठीत करण्यात येईल त्यांना सगळे पुरावे आम्ही देवू. चौकशीतून ज्यांची नावे राज्यसरकार समोर येतील ती नावे सरकारने जाहीर करावी जेणेकरून दंगलीमागचे खरे सूत्रधार कोण हे जगासमोर येईल.